जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: श्रावणी रविवारनिमित्त जेजुरीच्या श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री खंडोबादेवाच्या दर्शनासाठी वर्षभरात पन्नास लाखांहून अधिक भाविक येत असतात. आषाढ आणि श्रावण महिन्यात भाविकांची संख्या रोडावली होती. मात्र, दि. 7 रोजी श्रावणी रविवारमुळे हजारो भाविकांनी गडावर जाऊन श्री खंडोबादेवाचे दर्शन घेतले. कुळधर्म, कुलाचाराप्रमाणे तळीभंडार्याचा विधी करतानाचे चित्र गडावर पाहण्यास मिळाले.
श्रावणी रविवारमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ भाविकांनी फुलून गेली होती. भंडार-खोबरे, हार, फुले, प्रसाद, फोटो आदी दुकानांत भाविकांची गर्दी होती. श्रावण महिना सुरू झाल्यापासून जुनागड कडेपठार खंडोबा मंदिरात देवदर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी होत आहे. शनिवारी व रविवारी कडेपठार गडावर यात्रेचे स्वरूप पाहण्यास मिळत आहे. कडेपठारचा डोंगर निसर्गसौंदर्याने बहरला असून, देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचाही आनंद भाविका लुटत आहेत.