पुणे

शिरूरच्या माळी-धनगर पॅटर्नचा आगामी निवडणुकीत सर्वांनाच धसका

अमृता चौगुले

निमोणे : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर मराठा समाजाच्या खालोखाल माळी, धनगर समाजाचे वेळोवेळी वर्चस्व राहिले असल्याने या माळी-धनगर पॅटर्नचा आगामी निवडणुकीत सर्वांनीच धसका घेतला आहे. माजी आमदार पोपटराव कोकरे, पोपटराव गावडे यांनी विधानसभेमध्ये तालुक्याचे नेतृत्व केले. तळेगाव ढमढेरे गटावर किसनभाऊ भुजबळ यांनी उभी हयात निर्विवाद वर्चस्व राखले.

मागील वीस वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी वर्गासाठी आरक्षणाची दारे खुली झाली. मात्र, शिरूरच्या राजकारणात आरक्षणापूर्वीच ओबीसी वर्ग आपला आब राखून आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी 12 निवडणुका सर्वसाधारण जागेतून लढविल्या आणि त्यातील अकरा जिंकल्यासुध्दा. मात्र, तडजोडीच्या राजकारणामुळे त्यांच्याच कुटुंबातील इतरांना नंतर आरक्षित जागेचा आसरा घ्यावा लागला.

आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. मागील वीस वर्षांपासून तुमची उमेदवारी तुमच्या कोट्यातून, हे सूत्र बर्‍यापैकी रुजले आहे. अशा वेळेला सगळ्याच जागा सर्वसाधारण म्हणून लढायच्या असतील, तर प्रस्थापित माळी-धनगर पॅटर्नच्या नेतृत्वाची कसोटी लागणार, हे मात्र नक्की आहे.

तालुक्यातील बहुतांश जि. प. गट, पंचायत समिती गणांचे निकाल माळी-धनगर समाज निर्णायक क्षणी बदलू शकतो एवढी क्षमता या वर्गाकडे निश्चित आहे. सामाजिक सांधा साधत माळी-धनगर समाजाला नव्या राजकीय व्यवस्थेत सहभागी करणे, त्यांची मदत घेण्याबरोबरच त्यांचे नेतृत्व स्वीकारणे आणि रुजविणे, हे सगळ्याच राजकीय पक्षांपुढे आव्हान आहे.

मागील निवडणुकीत हक्काने ओबीसीची जागा असायची. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. सर्वसाधारण वर्गात इच्छुकांचा भरणा मोठा आहे. अशा परिस्थितीत हा चक्रव्यूह भेदून सत्तेत व निर्णयप्रक्रियेत सगळ्या घटकांना सामावून घेणे, ही तारेवरची कसरत सगळ्याच राजकीय पक्षांपुढे उभी राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT