शिरूर; पुढारी वृत्तसेवा: नगरपरिषदेच्या भंगार चोरीचा विषय शिरूर शहरात गाजत असून, या चोरीचा मास्टर माइंड कोण आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राजकीय रंग येऊ लागल्याची चर्चा शहरात चालू आहे. शिरूर नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या भंगार चोरीचे दोन गुन्हे घडले असून या दोन्ही गुन्ह्यासंदर्भात नगरपरिषदेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यात 23 ऑगस्ट रोजी शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी निवास येथील गाळ्यातील शटर उचकटून हजारो रुपयांचा माल चोरीला गेला होता. या संदर्भात नगरपरिषदेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात यावा व खर्या आरोपी भंगार व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष नीलेश जाधव यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यात अनेक दिवसांपासून चोर्यांचे सत्र सुरू असून शिरूर नगरपरिषदेचे भंगार चोरीस गेले आहे. या चोरीत शिरूरमधील एका भंगार व्यावसायिकाने व एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने संगनमताने अशा चोर्या घडवून आणल्या असल्याचा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या संदर्भात मनसेच्या वतीनेही पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.