शिरूर; पुढारी वृत्तसेवा: बंधार्याचे ढापे चोरी करणार्या आठ आरोपींना मोठ्या शिताफीने पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, आरोपींकडून नऊ चोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामगाव (ता. शिरूर) येथील घोड नदीवर बांधार्यांचे लोखंडी ढापे काही दिवसांपूर्वी चोरीस गेले होते, तर नुकतेच ढापे चोरीचा प्रयत्नदेखील फसला होता. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक करीत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व इतर तांत्रिक बाबी व गोपनीय बातमीदार यांच्याकडे तपास करीत असताना हा गुन्हा विनोद ऊर्फ मल्ल्या चित्तानंद मरगुत्ती, (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, ता. हवेली), महेश नागप्पा बिराजदार, (रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, भोसरी) यांनी इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची बातमी तपास पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने दोघांच्या हालचालींवर पथकाने लक्ष ठेवले होते. अशातच दोघेही साथीदारांसह भोसरीतील लांडेवाडी चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे लांडेवाडी चौक परिसरात पोलिसांनी सापळा रचून विनोद मरगुत्ती, महेश बिराजदार व त्यांचे इतर दोन मित्रांना लांडेवाडी चौकात शिताफीने ताब्यात घेतले.
रोहन शंकर बिराजदार, (वय 20, रा. पालखी हॉटेल मागे, भोसरी), आदित्य ऊर्फ अण्णा उमाशंकर रायजे (वय 20, सध्या रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, भोसरी) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांनी हा गुन्हा आणखी काही साथीदारांचे मदतीने केल्याचे सांगितले. गुन्हा करताना हुंदाई कंपनीची चंदेरी रंगाची एक्सेंट कार (एमएच 12 बीवाय 8356) चा वापर केल्याचेही सांगितले. तसेच इतर साथीदार लांडेवाडी-भोसरी रोडवरील जायका बिर्याणी हॉटेलजवळ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चौघांना सोबत घेऊन उर्वरित संशयितांचा शोध घेतला असता, जायका बिर्याणी हॉटेलजवळ आकाश महादेव बिराजदार (वय 23, आदिनाथ नगर, भोसरी), प्रशांत विजय मळेकर ऊर्फ बिराजदार (वय 25, वैदूवाडी, हडपसर), सुनील माधव जाधव, (वय 19, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि समीर लहू सरोदे, (वय 28, रा. निगडी) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा कबूल केला. गुन्हा करण्यासाठी महेश बिराजदार याने समीर सरोदेकडील एक्सेंट कार आणली होती. तिचा वापर संशयित आरोपींनी गुन्हा करताना केल्याचे पोलिसांना सांगितले. संशयितांमधील आरोपी शुभम ज्योतिबा पटाळे (रा. दावणगाव, ता. उदगीर, जि. लातूर), अनिल ऊर्फ अनुराग शिवा बिराजदार (रा. कोराळी, ता. निलंगा, जि. लातूर) हे फरार आहेत. आरोपींनी चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता, चोरी केलेला माल हा विनोद ऊर्फ मल्ल्या मरगुत्ती व आदित्य ऊर्फ अण्णा उमाशंकर रायजे यांनी भंगार व्यावसायिक फिरोज चांद शेख (रा. लांडेवाडी चौक, गव्हाणे वस्ती, भोसरी) यास विकल्याचे सांगितले. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार दीपक साबळे, जनार्दन शेळके आदींनी केला.
गुन्ह्याची कबुली
मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव खडकी येथील कोल्हापूर बंधार्यावरील 2 लाख 16 हजार किंमतीचे लोखंडी ढापे सोमवार, दि .4 जुलै रोजी पहाटे चोरीस गेले. तसेच नागापूर येथूनही मीना नदीवर असलेल्या बंधार्यावर 70 हजार रुपये किंमतीचे 90 ढापे शुक्रवार, दि .22 रोजी चोरीस गेले होते. सदर चोरीबाबत आरोपींनी कबुली दिल्याची माहिती मंचर पोलिसांनी दिली.