शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: पाबळ (ता. शिरूर) येथे बेल्हा- जेजुरी रस्त्यावर कंटेनरमधून वाहतूक करण्यात येत असलेले 22 टनाचे दोन पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून वाहनांना धडकून अपघात झाला. गुरुवारी (दि. 4) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अवजड असे पत्र्याचे रोल घेऊन कंटेनर (एमएच 46 एआर 4294) हा शिरूरकडून खेड सेझ येथे जात होता. हा कंटेनर हा पाबळ येथे मुख्य चौकामध्ये आला असता त्याचा ताबा सुटून तो पलटी झाला. यातील एक पत्र्याचा रोल रस्त्यालगत असलेल्या दूध डेअरीला धडकला, यामध्ये दूध डेअरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दुसरा रोल शेजारीच असलेल्या हॉस्पिटलजवळ धडकला. यामध्ये डॉक्टरांच्या खासगी वाहनाचे व दवाखान्यात आलेल्या एका रुग्णाच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्यांमध्ये दोन दुचाकींचाही समावेश आहे. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळेस घडल्याने जीवितहानी झाली नाही. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिक व वाहनांची वर्दळ असते. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचानाम केला.
गावातील रस्त्यावर दुभाजक हवेत
पाबळ गावातून बेल्हा- जेजुरी हा रस्ता काँक्रीटचा आहे. सुमारे दोन किलोमीटर एवढा लांबीचा रस्ता गावातून जातो. या रस्त्यालगत शाळा, बसस्थानक, व्यापारी संकुल, टपर्या आहेत. नवीन झालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढला आहे. भविष्यात होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी गावातून जाणार्या रस्त्यावर दुभाजक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.