पुणे, पुढारी वृत्तसेवा: विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आस्था आणि ओढ निर्माण होण्यासाठी फूल देऊन किंवा शालेय साहित्य देऊन त्यांचे स्वागत राज्यातील प्रत्येक शाळेत होणार आहे. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळांमध्ये हा प्रवेशोत्सव 15 जून रोजी आणि विदर्भात 27 जून रोजी होणार असून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी त्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शाळा 15 जून आणि विदर्भातील शाळा 27 जून रोजी सुरू होणार आहेत. शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा.
शाळा सुरू होण्याच्या दिवशी विद्यार्थ्यांचे फूल देऊन किंवा शालेय साहित्य देऊन स्वागत करावे, असे आदेश शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
दोन दिवस होणार शाळांचे निर्जंतुकीकरण
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळा निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 13 आणि 14 जून या दोन दिवशी शाळेत केवळ मुख्याध्यापक, शिक्षक हजर राहून शाळांची स्वच्छता करून घेणार आहेत.
महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार असून त्यापूर्वी शाळांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी सांगितले. मागील दोन वर्षात शाळा बंद राहिल्या होत्या.. काही शाळांमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केले होते. यंदा सर्व निर्बंध हटल्यामुळ 15 जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार आहेत.