सुनील जगताप : पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षामध्ये शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे ग्रेस गुण देताना अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या. परंतु, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने अखेर शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत क्रीडा विभागात हालचाली सुरू झाल्या असून शासनाकडे तसा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षामध्ये कोणत्याच प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे 5 टक्के खेळाडू आरक्षण अथवा ग्रेस गुणांबाबतचा तिढा निर्माण झाला होता. परंतु, यावर्षी या शालेय क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर, जिल्हा आणि राज्यपातळीवर घेण्याबाबत निर्णय झाला असून त्याबाबत शासनाकडेही विनंती करण्यात आलेली आहे. तसेच
या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तब्बल 64 खेळांचा समावेश करण्यात आला असून त्याच्या नियोजनाच्या हालचाली क्रीडा खात्यामध्ये सुरू झालेल्या आहेत.
शालेय क्रीडा स्पर्धेत कराटेचा समावेश
देश, राज्यपातळीवर कराटे खेळाच्या अनेक संघटना झाल्या असून वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यामुळे सर्वच स्पर्धांमधून कराटे खेळ गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, यावर्षी संघटनांनी वाद बाजूला ठेवून प्रशिक्षक आणि कराटे पंच यांना बरोबर घेऊन कराटे खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा भरविल्या जाणार आहेत.
केंद्रीय पातळीवर स्कूल फेडरेशनबाबत निर्णय झालेला नसला तरी राज्यपातळीवर शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत तयारी सुरू केलेली आहे. त्याबाबत शासनाकडेही प्रस्ताव पाठविला असून पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे. निर्णय आल्यानंतर त्वरित बैठक घेऊन क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले जाणार आहे.
– महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे