हिरा सरवदे
पुणे: शहरातील गोरगरिबांना वरदान ठरणारी शहरी गरीब योजनाही विमा कंपनीकडे देण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. यासाठी लवकरच विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) प्रमाणित विमा ब्रोकर नेमण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांसह आजी माजी सभासदांच्या कुटुंबासाठी अंशदायी वैद्यकीय योजना राबविली जाते. ही योजना विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. यासाठी विमा ब्रोकर नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढली जाणार आहे.
दरम्यान, ब्रोकर नेमणुकीच्या फेरनिविदेसाठी आयोजित केलेल्या बैठकीत शहरी गरीब योजना सरकारी विमा कंपनीमार्फत राबविण्यावर चर्चा झाली. सरकारी विमा कंपन्यांकडून दरपत्रक मागवून सदर विम्याचा समतुल्य मासिक हप्ता, प्रिमियम (ई.एम.आय) किती येऊ शकतो, याचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला. शहरी गरीब योजना विमा कंपनीच्या माध्यमातून राबविल्यास 25 कोटींपर्यंत प्रिमियम येऊ शकतो. त्यातून महापालिकेचे 30 ते 35 कोटी रुपये वाचू शकतील, असा दावा चर्चेदरम्यान करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कामी आय.आर.डी.ए. प्रमाणीत अनुभवी विमा ब्रोकरची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
काय आहे योजना ?
महापालिका हद्दीतील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे. अशा नागरिकांना महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी 1 लाखापर्यंत तर हृदयरोग, कर्करोग व मूत्रपिंडाच्या विकारावरील आजारासाठी 2 लाखांपर्यंत अर्थसाह्य मिळते. ही योजना 2010 पासून राबविली जात आहे. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 50 कोटींची तरतूद आहे.
सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी प्रयत्न
शहरी गरीब योजनेचा खर्च दरवर्षी वाढत असल्याचा दावा करत प्रशासनातील काही बड्या अधिकार्यांकडून ही योजना विमा कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. योजनेचे कार्ड काढून देण्याचे उपक्रम राबवून नगरसेवक जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्याकडून याला मोठा विरोध होऊ शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सर्व प्रक्रिया नवीन सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
झुरळ मारण्यासाठी घर जाळण्याचा प्रकार
शहरी गरीब वैद्यकीय योजनेत अनेक गैरप्रकार घडत असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जातात. धनाढ्यांकडून कमी उत्पन्नाचे दाखले मिळवून योजनेचे तीन तेरा वाजवले जातात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्रुटी दूर करून योजना सक्षमपणे राबविण्याचे सोडून पैशाची बचत करण्याच्या नावाखाली ही योजना विमा कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत.