पुणे ; पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी माझाही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत संबंध जोडला गेला होता आणि त्यातून माझी बदनामी केली होती. आता मंत्री नवाब मलिक यांचाही ते मुस्लिम असल्याने दाऊदशी संबंध जोडला जात आहे. त्यासाठीच त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात केला.
पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, 'मंत्री नवाब मलिक यांच्यावर यंत्रणेकडून आकसापोटी कारवाई केली जात आहे. मलिक गेली 20 वर्षे राजकारणात आहेत. आतापर्यंत त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता मात्र, आताच ही कारवाई करण्यात येत आहे.
मलिक यांना मंत्रिमंडळातून बाजूला करणार का, या प्रश्नावर पवार म्हणाले, 'सिंधुदुर्गमधील जुने सहकारी नारायण राणे यांनाही अलीकडेच अटक झाली होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले नाही. अटक झाल्यानंतरही राणे मंत्रिमंडळात आणि नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा, हा कुठला न्याय?' 'पंतप्रधान मोदी रविवारी पुण्यात येत आहेत व कदाचित तेच याबाबत स्पष्ट करतील,' असा टोलाही त्यांनी लगावला.
मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा : पवार
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. मेट्रोबरोबरच युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षादेखील अधिक महत्त्वाची आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्राने अधिक जोमाने प्रयत्न करावेत,' असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, 'युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करायला हवेत. मी काही दिवसांपूर्वी मेट्रोतून प्रवास केला होता. तेव्हा मेट्रोचे काम पूर्ण झाले नसल्याचे लक्षात आले. तरीदेखील मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत.'
पानशेत धरण फुटल्यानंतर पुणेकर देशोधडीला लागले. असे असताना अतिवृष्टी, ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार्या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते? असा थेट सवाल पवार यांनी केला. अशातच नदीसुधार प्रकल्पाकडे दुर्लक्ष करणे, हे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यपाल कोश्यारींबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानच निर्णय घेतील
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी विधिमंडळात अभिभाषण अर्ध्यावरच थांबविले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधान केले याचा संदर्भ देत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर जोेरदार टीका केली. बारा आमदारांच्या नियुक्त्यांचा विषयही त्यांनी वर्षभर प्रलंबित ठेवला आहे. त्यांनी आपल्या वर्तनातून राज्यपालपदाची अप्रतिष्ठा केली आहे. हे असेच चालू राहणार असेल तर मग राष्ट्रपती आणि पंतप्रधानच त्यांच्याबद्दल काय ते ठरवतील, असे पवार म्हणाले. या राज्याला पी.सी. अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल लाभले. इतरही नामांकित राज्यपाल होऊन गेले. या परंपरेचा कुठेतरी विचार व्हायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.