पुणे

शंभरावे नाट्यसंमेलन पुण्यात व्हावे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शंभराव्या नाट्यसंमेलनाची आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. शंभराव्या नाट्यसंमेलनाला विशेष महत्त्व असल्याने हे संमेलन पुणे जिल्ह्यात व्हावे आणि संमेलनाचे पहिले पुष्प सादर करण्यासाठीचा बहुमान पुणे शाखेला मिळावा, या मागणीचे पत्र अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना नुकतेच देण्यात आले.

नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि पुणे शाखेचे पुन्हा अध्यक्ष झालेले मेघराज राजेभोसले यांनी हे पत्र पाठविले आहे. त्यात पुणे जिल्ह्याला हा बहुमान मिळावा, असे नमूद केले आहे. आता 21 नोव्हेंबरला होणार्‍या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची चिन्हे आहेत. नाट्यसंमेलनाचे वेध नाट्यकर्मींना लागले आहेत. नाट्यसंमेलन कुठे होणार इथंपासून ते संमेलनाच्या आयोजनापर्यंतच्या चर्चा नाट्य वर्तुळात रंगत आहेत.

याविषयी मेघराज राजेभोसले म्हणाले, जर महाराष्ट्रात विविध ठिकाणी संमेलनाची पुष्पे सादर करायची असतील, तर नाट्य परिषदेची पुणे शाखा ही महाराष्ट्रातील मुंबई बाहेरची पहिली शाखा म्हणून ओळखली जाते. हा बहुमान त्यावेळच्या नाट्य परिषदेच्या धुरिणांनी 1978 साली पुणे शाखेला दिला आणि 25 मे 1978 रोजी नटश्रेष्ठ चित्तरंजन कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शाखेची वाटचाल सुरू झाली. हा बहुमान त्या वेळी पुणे शाखेला मिळाला. तसाच बहुमान यावर्षीच्या नाट्यसंमलेनाचे पहिले पुष्प सादर करण्यासाठी आम्हाला मिळावा, यासाठी मध्यवर्ती शाखेला पत्र पाठविले आहे.

शंभरावे नाट्यसंमेलनाचे पहिले पुष्प पुणे जिल्ह्यात व्हावे, अशी नाट्यकर्मींची इच्छा आहे. पहिली शाखा म्हणून पुण्याला हा बहुमान मिळाला पाहिजे. पुण्यात संमेलनाचे उद्घाटन सर्व सात शाखा मिळून त्यासाठीचे नियोजन करणार आहेत.

– दीपक रेगे, कार्यकारिणी सदस्य, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT