दत्तात्रेय नलावडे
वेल्हे : अतिवृष्टीमुळे गुरुवार (दि. 14) पासून शनिवार (दि. 16) पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, शिक्षकांनी नियमितपणे शाळेत जावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असतानाही वेल्हे तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक फिरकले नाही. या शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश वेल्हे तालुका पंचायत समितीने दिले. हवेली तालुक्याच्या सिंहगड, पश्चिम भागातील अनेक प्राथमिक शाळांतही असेच चित्र होते. वेल्हे तालुक्यात सर्वांत गंभीर चित्र होते. जवळपास सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षक अनुपस्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिवृष्टीच्या काळात चार दिवस (रविवारसह) शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. त्यानुसार 14 ते 16 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली.
मात्र, शाळेतील सर्व शिक्षकांनी शैक्षणिक वेळेत शाळेतच उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असताना जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला वेल्ह्यातील शिक्षकांनी केराची टोपली दाखवली. जिल्ह्यात सर्वांत अधिक वेल्हे तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले. मोठमोठी पाच धरणे, अतिदुर्गम प्रदेश असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पुणे-पानशेत, कादवे, वरघड आदी ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, शेती, जनावरे वाहून जाणे, पुरामुळे रहिवाशांचा संपर्क तुटणे अशा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्यांनी गावांत थांबून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक शाळांचे बहुतेक शिक्षक तालुक्याबाहेर किंवा मुख्यालयात राहत आहेत. प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. त्यामुळे आदेश असूनही शिक्षक घरातून बाहेरच पडले नाहीत. अनेक जण शाळेला सुटी असल्याने गावी गेले. याबाबत गटविकास अधिकारी पंकज शेळके म्हणाले की, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना सुटी होती. मात्र, शिक्षकांना सुटी नव्हती. या कालावधीत शाळेवर नसलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. चौकशीनंतर प्रशासनाच्या निर्णयानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनीही याबाबत चौकशी करण्यात येणार आहे, असे सांगितले.