वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत खोर्यात ऐन गणेशोत्सवात बिबट्याची दहशत सुरू आहे. पानशेतजवळील रुळे येथील दुर्गम डोंगरावरील बंगल्यात शिरलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून बंगल्याची राखण करणार्या वयोवृद्ध दाम्पत्याचे प्राण नशीब बलवत्तर म्हणून वाचले. बुधवारी (दि. 31) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या बंगल्यातून निघून शेजारच्या जंगलात गेला. तेव्हा वयोवृद्ध दाम्पत्याने सुटकेचा श्वास घेतला. संपूर्ण रात्र दोघांनी बिबट्याच्या दहशतीत जागवली.
गांधी नामदेव फाकळे (वय 80) व त्यांच्या पत्नी इंदूबाई गांधी फाळके (वय 75) असे सुदैवाने वाचलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. पानशेत खोर्यात दोन आठवड्यापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत कुत्री, शेळ्या, वासरे अशा दहा जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील रुळे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत उंच डोंगरावर असलेल्या खासगी फार्म हाऊस संकुलात असलेल्या गिझरे फार्म हाऊस बंगल्याची राखण फाळके दांपत्य करत आहेत. ते मूळचे रुळे येथील फाळकेवाडी येथील आहे.
मंगळवारी (दि.30) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गांधी फाळके व इंदूबाई फाळके हे शेजारील निवंगुणे यांच्या गोठ्यात दूध आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी एका धष्टपुष्ट बिबट्याने गेटची जाळी तोडून आत प्रवेश केला. 10 ते 15 मिनिटांनी फाळके दाम्पत्य दूध घेऊन बंगल्यात आले. त्या वेळी बंगल्याच्या पायर्यांवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी प्रसंगावधानता दाखवत गांधी फाळके यांनी बिबट्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे बिबट्या जागीच उभा राहिला.
मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा दोघांच्या दिशेने चाल केली. त्या वेळी पती-पत्नीने जिवाच्या आकांताने मोठमोठ्याने आरडाओरडा केला. हातातील काठी गांधी यांनी जोरजोरात आपटत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे तेथून बिबट्या शेजारच्या शेतात जाऊन लपला .
त्यानंतर दोघेही बंगल्यात शिरले. त्यानंतर बिबट्या पुन्हा बंगल्याच्या पायर्यांवर आला. बिबट्या रात्रभर बंगल्याच्या भोवती घिरट्या घालत होता आणि पुन्हा बंगल्याच्या पायर्यांवर येऊन बसत होता. त्यामुळे रात्रभर या वयोवृद्ध दाम्पत्याने रात्र जागून काढली. सकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या निघून गेला.
पानशेत खोर्यात बिबट्याचा वावर आहे. या आधी दापसरे येथे बिबट्याने मारलेल्या जनावरांचे नुकसान शेतकर्यांना दिले आहे. रुळे येथील जंगलात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
– बंडू खरात, वनरक्षक, पानशेत वनविभाग