वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. खडकवासला धरणाच्या 144 वर्षांच्या इतिहासात प्रथमच धरणावर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खडकवासला जलसंपदा विभागाच्या वतीने पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणावर शनिवारी (दि. 13) रात्री आकर्षक विद्युत रोषणाई केली. लेझर किरणांचे प्रकाश झोत धरणांच्या मुख्य भिंतीतील सांडव्यांवर सोडण्यात आले आहेत.
यामुळे धरणांतून बाहेर पडणारे पाण्याचे रात्रीच्या अंधारात विहंगम दृश्य दिसत आहे. सर्वात विलोभनीय दृश्य खडकवासला धरणावर आहे. मुठा नदीच्या पात्रात पडणार्या पाण्याचे विलोभनीय दर्शन पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. बि—टिश राजवटीत 1879 मध्ये खडकवासला धरण बांधण्यात आले, तेव्हापासूनच्या 144 वर्षांच्या इतिहासात प्रथमच खडकवासला धरण अशा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव धरणही प्रथमच रोषणाईने उजळून निघाले आहे.
धरणसाखळीत 98 टक्के पाणीसाठा
धरण क्षेत्रात रविवारी (दि. 14) पावसाचा जोर कमी झाला, यामुळे धरणांतील विसर्गात कपात करण्यात आली. खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 28.77 टीएमसी (98.70 टक्के) पाणीसाठा झाला होता. सध्या खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात 7 हजार 276 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. वरसगाव धरणही भरून वाहू लागले आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, 'पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे.'
धरणांतील पाणीसाठा
खडकवासला : 100 टक्के
पानशेत 100 टक्के
वरसगाव 100 टक्के
टेमघर 89.78 टक्के