पुणे

विरंगुळा म्हणून सुरु केलेल्या खेळात आज ती पडते आहे प्रतिस्पर्ध्यांवर भारी….

अमृता चौगुले

  पुणे :

सर्वच ठिकाणी क्रीडाक्षेत्रात प्रगती होत असताना त्यात मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांच्या घरातील मुलांचा समावेश असण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु, खेड तालुक्यातील एका खेडेगावातून आलेल्या शेतकर्‍याची मुलगी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करीत आहे. असे असले, तरीही तिच्या या प्रगतीत आर्थिक परिस्थिती मोठा अडथळा ठरत आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या पिंपरी बुद्रुक येथील सोमनाथ वाळुंज यांची कन्या एकता वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करीत आहे. घरात कोणत्याही प्रकारचे खेळाचे वातावरण नसताना ती केवळ विरंगुळा म्हणून धावणे आणि लंगडी खेळत असे. मात्र, गावातील काही मुले वेटलिफ्टिंगचा सराव करीत असल्याने एकतालाही त्यांनी खेळासाठी आग्रह केला.

वेटलिफ्टिंगचा केवळ विरंगुळा म्हणून सराव करताना तिला स्पर्धेची आस लागली. यामधूनच एकताने राज्यपातळीवर आत्तापर्यंत 5 सुवर्णपदकांची कमाई केली असून, भुवनेश्वर येथे झालेल्या सीनिअर गटाच्या स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. खेड येथील हुतात्मा राजगुरू कॉलेजमध्ये कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एकताला अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केले. या खेळातील अधिक प्रशिक्षणासाठी सध्या सांगलीमध्ये संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.

दै. 'पुढारी'शी बोलताना एकता म्हणाली, 'या खेळामध्ये मला राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत पोहोचायचे आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आहारासह सरावाचा खर्च पेलवत नाही. आई, वडील आणि मोठा भाऊ केवळ शेती करीत असून, लहान भाऊ शिक्षण घेत आहे. मला वेटलिफ्टिंगमध्ये मोठे करिअर करायची इच्छा असून, समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.'

पुण्यात केवळ सुविधाच
पुण्यामध्ये एवढ्या सुविधा असताना वेटलिफ्टिंगसाठी सांगलीला का जाते, असा प्रश्न एकताला विचारला असता ती म्हणाली की, वेटलिफ्टिंगसाठी पुण्यात भरपूर सोयी-सुविधा आहेत. परंतु, त्या पातळीवर प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक नाहीत. त्यामुळे सांगलीला जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT