मोरगाव, पुढारी वृत्तसेवा: बारामती आगाराची विनाथांबा बारामती-पुणे एसटी बस सकाळी मोरगाव बसस्थानकापासून बारामतीकडे एक किलोमीटर अंतरावर बंद पडली. यातील प्रवाशांना दुसरी बस येईपर्यंत वाट पाहावी लागली. बारामती आगाराच्या विनावाहक बसमधून बारामती परिसरातील पुणे येथे जाणारा नोकरवर्ग तसेच विद्यार्थीवर्ग पसंती देतात.
मात्र या बस रस्त्यात कुठे बंद पडतील याचा भरवसा नाही. पुणे येथे जाणार्या नोकरवर्गाला वेळेत न पोहचल्याने रजा भरावी लागते. या समस्येमुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण होत आहे. बारामती आगाराची (एमएच 06 डब्लू 0647) विनाथांबा बस रस्त्यात ब्रेक डाऊन झाल्याने बंद पडली, असे चालक महेंद्र भोंडवे यांनी सांगितले.
या बसची चाचणी करणे व परीक्षण करणे हे वरिष्ठांचे कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास होतो, असे या बसमधील प्रवाशांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विनाथांबा नादुरुस्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
हेही वाचा