पुणे

विद्युतपंप, स्टार्टरच्या चोर्‍या थांबवा, शेतकरी संघर्ष समितीचे पोलिसांना निवेदन

अमृता चौगुले

बावडा : पुढारी वृत्तसेवा

बावडा परिसरात शेतकर्‍यांच्या विद्युतपंप, केबल, स्टार्टर यांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे इंदापूरचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्याकडे केली आहे. चोरटे समूहाने येऊन केबलमधील तांब्याच्या तारांची चोरी करतात. दुकानदारांशी संगनमत करून विक्री करतात.

नापिकीसह विविध कारणांनी अगोदरच मेटाकुटीस आलेला शेतकरी वाढत्या चोर्‍यांमुळे आणखीनच त्रस्त झाला आहे. बावडा भागात पाच-सहा महिन्यांपासून हा प्रकार चालू असून, शेतकर्‍यांना कामधंदा सोडून इंदापूरला तक्रारी देण्यासाठी जावे लागत आहेत. यासंदर्भात कारवाई करावी; अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. पंडितराव पाटील, विजय घोगरे, धैर्यशील पाटील, विजय गायकवाड, पवनराजे घोगरे, सुरेश शिंदे, सचिन सावंत, तुकाराम घोगरे आदींच्या सह्या आहेत. यासंदर्भात ग्रामसुरक्षा दले मजबूत केली जातील व बावडा येथे यासंदर्भात शेतकर्‍यांची बैठक घेतली जाईल, असे पोलषस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT