पुणे: पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्यांना मूलभूत सेवासुविधा देताना आरोग्यविषयक सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी पुण्यात येत असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
पालखी मुक्काम आणि मार्ग परिसरातील सर्व रस्ते, गल्लीबोळ, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचरापेट्या, गटारे, ड्रेनेज आदींची स्वच्छता तीन पाळ्यांमध्ये कर्मचार्यांकडून केली जाणार आहे. तसेच वारकर्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, निर्जंतुकीकरण, शौचालये आदी सेवासुविधांची व्यवस्था असेल.
नाना पेठेतील पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी पालख्यांचा मुक्काम राहणार आहे. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या परिसरात वारकर्यांसाठी पाण्याचे टँकरही असतील. तसेच सॅनिटरी नॅपकिन वाटपासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.
महापालिकेने वारकर्यांसाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि मार्गावर 21 ठिकाणी औषधांचे वाटप आणि उपचार केंद्रांची व्यवस्था केली आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नाना पेठेतील रफी महंमद किडवाई शाळा आणि मामासाहेब बडदे दवाखान्यात वारकर्यांसाठी कोरोना लसीकरणाची मोफत सुविधा केली आहे. यासोबतच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू राहणार
महापालिकेच्या वतीने महिला वारकर्यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या 10 शाळांमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटत केले जाणार असून पालखी तळ परिसरात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर स्त्रीरोगतज्ज्ञही नेमण्यात येणार आहेत.
पालखी मार्गावर पालखी आगमनापूर्वी व पालखी पुढे गेल्यानंतर झीरो गार्बेज संकल्पनेअंतर्गत रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. पालखी दरम्यान 'प्लास्टिक'चा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सार्वजनिक हौद आणि मोकळ्या जागांची सफाई करण्यात आली असून, त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरचा वापर करण्यात आला.
पालखी सोहळ्यादरम्यान पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालखीच्या मुक्कामांच्या ठिकाणी तसेच वारीमध्येही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच 28 ठिकाणी तात्पुरते नळजोडही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाण्याची कमतरता भासणार नाही, असे नियोजन केल्याचे पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
हेही वाचा