पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अवतारामुळे ब्रह्मरस पिकाला आला. फळ जेव्हा पिकते, तेव्हा घरभर त्याचा वास सुटतो. तसाच तुकोबारायांच्या ज्ञान, भक्ती, प्रेमाने वारकरी संप्रदायाचा सुवास सर्व विश्वभर पसरला आहे,' असे मत ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कामिका एकादशीनिमित्त झालेल्या कीर्तनात टाळ मृदंगाच्या गजरात जय जय विठोबा, रखुमाई… चा नामघोष झाला. सातारकर म्हणाले, 'ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ज्ञानात लगेच अहंकार येतो. अहंकार आला की माणसांची घरे फुटतात. जिथे भक्ती आहे, तिथे प्रेमाचा ओघ आहे. प्रेम व भक्तीत सर्व परिपूर्णतेने प्रकट होते. तुकाराम महाराज हे भक्ती व प्रेमाचे कळस आहेत. भक्ती, प्रेम, सुख सर्वांना प्राप्त होत नाही, त्याकरिता परमेश्वराचे व्हावे लागते. जो भक्ती प्रेमात रंगला त्याच्या नावाने भक्ती आपोआप होते.
' विठ्ठल नामस्मरण जेव्हा सुरू होते, तेव्हा भक्ती निर्माण होते. त्यावेळी खरे-खोटे, चांगले-वाईट या सर्वांच्या पलीकडे आपण जातो. सर्वांनी विठ्ठल म्हणावेच, पण तुकोबारायांनी विठ्ठल म्हणण्याचा आनंद अलौकिक आहे. परमार्थात परमेश्वराचे नाव घेतल्यानंतर सर्व अंत:करण पालटून जाते. आई झाल्याशिवाय ती भक्ती कळत नाही. माणसाला परमेश्वर नको, सुख पाहिजे. फक्त सुखाकरिता आपल्याला परमेश्वर हवा आहे, असेही त्यांनी सांगितले.