चाकण : पुढारी वृत्तसेवा; खेड तालुक्यातील वाकी खुर्द गावाला वीजपुरवठा करणार्या रोहित्रात बिघाड झाल्याने गाव 15 दिवसांपासून अंधारात आहे. वीज नसल्याने पाण्याच्या टंचाईचादेखील येथील ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. शनिवारी (दि. 2) संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. महावितरणने ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाकी खुर्द गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून या गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी, दळण अशा दैनंदिन गरजांसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
महावितरणचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष नसल्याने जनतेमधून यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पाणीपुरवठा होत नसल्याने संतापलेल्या महिलांनी शनिवारी वाकी खुर्द ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. वाकी खुर्द ग्रामपंचायतीचे प्रशासन व सरपंच यांनी, महावितरणच्या गलथान कारभारामुळे गाव अंधारात आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा करता येत नाही, असे सांगितले. याबाबत महावितरणच्या चाकण विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले, की वाकी खुर्द गावात मागील आठवडाभरात दोनदा रोहित्र दुरुस्त करून बसवले होते. मात्र, ते सतत नादुरुस्त होत आहे; मात्र तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचेदेखील महावितरणकडून सांगण्यात आले.