पुणे

वर्गातील एसी बंद केल्याने मारहाण; औंध आयटीआयमधील प्रकार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वर्गातील एसी बंद केल्याच्या कारणातून चौघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवाय झाडाच्या फांदीने बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगडाने मारून जखमी केले. ही घटना 1 जुलैला दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुलांच्या वसतिगृहाजवळ औंध आयटीआय येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी सोहन बडीजवार (वय 19), विनायक गुंजल (वय 19), शैलेश आणि किरण (वय 19) या नावांच्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सिद्धांत विजयराज वडमारे (वय 22, रा. नगररोड) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि आरोपी हे सर्वजण औंध येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहेत. फिर्यादी तरुण हा लेक्चर संपवून वर्गाच्या बाहेर आला असता आरोपींनी त्याला येथील मुलांच्या वसतिगृहाजवळ घेऊन जाऊन वर्गातील एसी का बंद केला, या कारणातून लाथाबुक्क्या व झाडाच्या फांदीने मारहाण केली. त्यावेळी बडीजवार याने दगड डोक्यात मारून फिर्यादी तरुणाला जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर मारहाण झालेल्या तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT