कामशेत : कामशेतकडून वडीवळेकडे जाणार्या रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक 42 जवळ भुयारी मार्गाखाली पावसाचे पाणीच पाणी जमा झाले आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कामशेतकडून वडीवळेकडे जाणार्या रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक 42 जवळ भुयारी मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमा झाले आहे. कामशेत येथे वडीवळे गावाकडे जाण्यासाठी लोहमार्गाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.
मात्र, या कामाला दोन वर्षे उलटूनही भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. पुलाखालील रस्त्याचे काम करण्यासाठी रेल्वे विभागाकडून उशीर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करत आहे. काम सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कामशेत रेल्वे विभागाशी वारंवार संपर्क साधला आहे. दीर्घ पाठपुराव्यानंतरही भुयारी मार्गाचे काम पूर्ण होत नाही. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत सूचना मांडली होती. तरीही रेल्वे विभागाने काहीच उपाययोजना केली नाही.
या पुलाची रचना चुकीची आहे. या पुलाचा पावसाळ्यात काही उपयोग होणार नाही. हे रेल्वे गेट बंद असल्याने कामशेत हद्दीतील भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे वडीवळे गावाकडे जाणारी वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कामशेत येथील रेल्वे गेट नंबर 42 येथे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून संथ गतीने भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मुख्य रस्ता रेल्वे रूळ ओलांडून कामगार, विद्यार्थी, दूधवाले शिक्षक, व्यावसायिक येजा करत असतात. येथे 20 फूट पाणी साचले असल्यामुळे वाहने जाणे अशक्य आहे.
– सतीश ढमाले, नागरिक, सांगिसे