पुणे

‘वडाप’च्या परवान्याचा प्रस्ताव पुन्हा बारगळला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: वडाप- मॅक्सी कॅब वाहतुकीला प्रवासी वाहतुकीचा अधिकृत परवाना देण्यास राज्यातील सार्वजनिक वाहतूक पुरविणार्‍या संस्थांनी परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे वडापवाल्यांचा परवान्याचा प्रस्ताव पुन्हा बारगळला. महाराष्ट्रातील शहरांलगत सुरू असलेल्या वडाप वाहतुकीला अधिकृतरीत्या परवानगी देण्याची मागणी विविध स्तरावरून परिवहन आयुक्त कार्यालयाला करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव परिवहन आयुक्त कार्यालयाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून मुंबई येथे राज्यातील विविध सार्वजनिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. नुकतीच ही बैठक पार पडली. या बैठकीत पुण्याची पीएमपीएमएल, सोलापूरची एसएमटी, कोल्हापूरची केएमटी, मुंबईची बेस्ट, नवी मुंबईची एनएमटी, ठाण्याची एनएमटी यासह विविध सार्वजनिक वाहतूक पुरविणार्‍या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासोबतच एसटी महामंडळाचे अधिकारी शेखर चन्ने देखील उपस्थित होते. माजी प्रधान सचिव रमाकांत झा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याऐवजी परिवहन सहआयुक्त जितेंद्र पाटील
उपस्थित होते.

यावेळी वडाप वाहतुकीला परवाना देऊन अधिकृतरीत्या परवानगी द्यावी की नाही, याबाबत विचारणा केली. त्यावेळी सर्वच सार्जनिक वाहतूक पुरविणार्‍या संस्थांच्या अधिकार्‍यांनी वडाप (मॅक्सी कॅब) वाहतुकीला विरोध दर्शविला. यावेळी उपस्थित सार्वजनिक वाहतूक संस्थांच्या प्रतिनिधींनी वडाप चालकांकडून होणारे प्रवाशांचे हाल आणि चढाओढीच्या स्पर्धेत होणारे अपघात, त्यासोबतच प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची कोंबाकोंबी आणि त्यातून सार्वजनिक संस्थांना होणारे नुकसान, याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालय आणि बैठकीच्या अध्यक्षांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT