वडगाव मावळ/कामशेत : मावळ तालुक्यातील कोथर्णे गावातील मंगळवारी बेपत्ता झालेल्या सातवर्षीय चिमुरडीचा मृतदेह बुधवार (दि.3) सकाळी आढळला. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला जेरबंद केले असून, या चिमुरडीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे निष्पन्न करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची महिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (24, रा.कोथुर्णे) असे आरोपीचे नाव आहे.
कोथुर्णे गावातून मंगळवारी (दि. 2) दुपारी साडे तीन वाजल्यापासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही तिचा तपास न लागल्याने तिच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.
सदर प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवून पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहीते, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देवून अपहरण झालेल्या मुलीचा संपूर्ण गावात मुलीचा शोध घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, वडगाव पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक निरीक्षक आकाश पवार, नेताजी गंधारे, संदेश बावकर, प्रदीप चौधरी, निलेश माने यांचे नेतृत्वात तपास पथके तयार केली.
तपास पथकामार्फत बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना कोथुर्णे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुस अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह संशयीतरित्या मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करत काही तासातच आरोपीला
जेरबंद केले. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक निरीक्षक आकाश पवार, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे, यांच्या पथकाने केली.