पुणे

वंचित बहुजन आघाडीही पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : राज्यातील गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखवून दिलेल्या वंचित बहुजन आघाडीने पुणे महापालिकेच्या 48 प्रभागांत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकत्र्यांच्या बैठका घेत त्यांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली.

पुणे मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराने 64 हजार मते मिळविली. त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पुण्यातील तीन मतदारसंघांत दहा हजारांपेक्षा अधिक मते मिळविली, तर अन्य चार मतदारसंघांतही अस्तित्व दाखवून दिले. 'वंचित आपल्या दारी' हा कार्यक्रम पक्षातर्फे गेले आठ महिने राबविला जात आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात. महापालिकेशी निगडित असलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते क्षेत्रीय कार्यालयात त्या लोकांसह जातात.

बहुतेक समस्या सोडविल्यानंतर ते तेथून बाहेर पडतात. अशा पद्धतीने पक्षाचे काम झोपडपट्टी व वस्ती विभागात वाढविण्यावर पक्षातर्फे भर दिला जात आहे. आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी म्हणाले, 'सध्या 48 प्रभागांत उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. उर्वरित प्रभागांतही उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे पुण्यात सुमारे एक लाख मते असल्याचे स्पष्ट झाले. त्या निवडणुकीपूर्वी आमची तयारी फारशी झालेली नव्हती.

आता प्रभागनिहाय कार्यकत्र्यांची फळी उभी राहिली आहे. वस्ती पातळीवर केलेल्या कामांचा आधार घेत आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघांवर वंचित बहुजन आघाडीने लक्ष केंद्रित केले आहे. वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वती या विधानसभा मतदारसंघांत वस्ती विभाग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठिकाणी आघाडीच्या कार्यकत्र्यांची संख्याही अधिक आहे. त्यातील प्रमुख कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची स्थिती निर्माण झाल्यास काही प्रभागात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. असे काही उमेदवार शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेण्याची शक्यता आहे. आघाडीमध्ये आंबेडकर चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत. विविध लहान-मोठ्या संघटनांचे कार्यकर्तेही आघाडीत आहेत. अनुसुचित जाती, ओबीसी, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी उमेदवारी दिल्याने समाजाचा मोठा घटक वंचित बहुजन आघाडीकडे वळाला आहे.

विविध आंदोलने व समाज घटकांचे मेळावे घेत संघटना मजबूत करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. विविध प्रभागांत लढताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे धक्कादायक निकालही लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती काही मतदारसंघांत आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक महापालिकेत निवडून जावेत, यासाठी कार्यकर्ते अधिक प्रयत्नशील राहणार असल्याचे आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

https://youtu.be/IYYU1mogoqk

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT