येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पावसाचा गेल्या चार दिवसांपासून जोर कमी झाला तरी कलवड, लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर पाण्याची डबकी तशीच साचून आहेत. नैसर्गिक प्रवाहाला बांधकामे, अतिक्रमणे यांच्या आलेल्या अडथळ्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होताना दिसत नाही. परिणामी, वाहतुकीचा वेग मंद होऊन येथे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होत आहे.
महापालिकेचा पथ विभाग आणि मलनिस्सारण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कलवड ते खेसे पार्ककडे जाणार्या रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिकरीत्या पुढे जाणारे पाणी अडविल्याने सखल भागात खूप पाणी साचून आहे. बांधकाम विभागाने बांधकाम परवानगी देताना नाल्यावर कशी काय परवानगी दिली, असा प्रश्न माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण आयुक्तांना भेटून येथे पावसाळी लाइन टाकण्याची मागणी केली असून, जर ही समस्या सुटली नाही, तर आपण आंदोलन करणार असल्याचेही टिंगरे यांनी सांगितले.
स्थानिक नागरिक उषा मोरे म्हणाल्या की, सखल भागात सुमारे कमरेइतके पाणी साचून असल्याने तेथून ना दुचाकीवरून जाहा येते ना पायी. त्यामुळे नागरिकांना येथून इतर भागात ये-जा करणे लांबच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. घरकाम करणार्या महिलांना तर दोन किमी वळसा घालून कामावर जावे लागत आहे.
'लोहगाव-वाघोली रस्त्यावर कर्मभूमीनगरजवळ देखील पावसाचे पाणी खूप साचून आहे. या ठिकाणी तळे तयार झाले आहे. नैसर्गिक स्रोत भराव टाकल्यामुळे पाणी जाण्यास मार्ग नाही. पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, 'रस्त्यावर साचलेले पाणी निचरा करण्याची जबाबदारी मलनिस्सारण विभागाची असून, त्या विभागाकडे संपर्क साधावा.' मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता विनायक शिंदे म्हणाले की, पथ विभागाची जबाबदारी असून, भाजप शिष्टमंडळाला पथ विभागप्रमुखांनी साचलेले पाणी काढण्यात येईल, असे सांगितले.
प्रशासनाची टोलवाटोलवी
नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर मलनिस्सारण विभाग म्हणते पाण्याचा निचरा करण्याचे आमचे काम नाही. पथ विभागाला संपर्क केला असता पथ विभाग म्हणते मलनिस्सारण विभागाचे काम आहे. असे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, पाणी तसेच रस्त्यावर तुंबून आहे.