पुणे

लोणावळ्यात मुसळधार, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

अमृता चौगुले

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच मंगळवारी (दि.12) सकाळी 7 वाजल्यापासून बुधवारी (दि.13) सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 213 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर त्यानंतर पुढील 10 तासांत म्हणजे बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरम्यान तब्बल 170 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे एकूण 34 तासात लोणावळा शहरात 383 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील 24 तासात लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा कंपनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिला आहे. तर लोणावळा नगरपरिषदेने देखील शहरातील नदीकाठी राहणार्‍या नागरिकांसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या भागात रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. लोणावळा शहरात मंगळवारी सकाळपर्यंत 1735 मिमी (68.31 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत 1306 मिमी (51.42 इंच) पाऊस नोंदविण्यात आला होता. लोणावळा शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तुंगार्ली, गोल्ड व्हॅली यासारख्या काही सखल भागात तसेच ग्रामीण भागातील कुसगाव बु. येथील काही रहिवासी भागात पाणी शिरल्याने तसेच अनेक रस्त्यांवर पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुणे वेधशाळेने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

SCROLL FOR NEXT