पुणे

लोणावळा : रिक्षा व्यवसायावर पीएमपीचा घाला

अमृता चौगुले

लोणावळा : वर्षांनुवर्षे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणार्‍या गरीब स्थानिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर मागील काही महिन्यांपासून पीएमपी बससेवेमुळे संक्रात आली आहे. ग्रामीण भागात पीएमपी बससेवा सुरू केल्यामुळे रिक्षाचालकांचे जिणे मुश्कील झाले आहे. लोणावळा शहर ते कामशेतदरम्यान आणि तेथून पुढे वडगाव मावळपर्यंत शेकडोंच्या संख्येने स्थानिक रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत आहेत. या मार्गाच्या आसपासच्या गावात राहणार्‍या स्थानिक प्रवाशांना सहजतेने प्रवास करण्यासाठी या रिक्षा म्हणजे एकमेव साधन होते.

मात्र, मागील काही वर्षांपासून पीएमपीने आपली बससेवा वडगावपासून पुढे कामशेतपर्यंत आणि आता पुढे लोणावळा शहरापर्यंत सुरू केल्याने या स्थानिक प्रवाशांना प्रवासासाठी आणखी एक साधन उपलब्ध झाल्याने त्यांचा ओढा पीएमपीकडे वाढू लागला आहे. याचा परिणाम साहजिकच स्थानिक रिक्षाचालकांच्या व्यवसायवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

दोन बसच्या फेर्‍यांमधील अंतर वाढवा
पीएमपीच्या बससेवेला आमचा विरोध नाही. सुरुवातीला दोन बसच्या फेर्‍यांमधील अंतर किमान अर्धा तास असायचे. मात्र, आता या बस फेर्‍यांमधील अंतर कमी करून एकापाठोपाठ बस सोडल्या जातात. त्यामुळे प्रवासी सहा आसनी रिक्षा स्टँडपर्यंत येतच नाहीत, अशी तक्रार रिक्षाचालक करीत आहेत. माजी नगरसेवक निखिल कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहरातील सहा आसनी रिक्षा संघटनांनी पीएमपीच्या फेरी संख्येवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. तसेच, यासाठी ते लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनादेखील भेटले आहेत.

संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष
दरम्यान, एरवी निवडणूक आली की, आमचे उंबरे झिजवणारे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी आता मात्र आमच्या या अडचणींकडे ढुंकूनही बघायला तयार नसल्याच्या भावना रिक्षाचालक संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केल्या आहे. सहा आसनी रिक्षाचालकांच्या व्यवसायावर घाला घालणार्‍या बससेवेच्या फेर्‍या किमान मर्यादित कराव्यात, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे.

बस थांबा अन्यत्र हलवावा
लोणावळा शहरातील टेलिफोन एक्सचेंज जवळील पीएमपीचा बसथांबा तेथून हलवून किरण पेट्रोल पंप, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन ते पुढे पीडीसीसी बँक या मार्गावर स्थलांतरित करावा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. या ठिकाणी बसथांबा केल्यास बस बाहेर पडताना मुख्य जुन्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूककोंडीदेखील कमी होईल. तसेच, ग्रामीण पोलिस स्टेशनच्या आतल्या रस्त्यावर बस बिनदिक्कत उभ्या करता येतील आणि येणारे प्रवासीदेखील बस किंवा रिक्षा यापैकी त्यांना सोयीस्कर ठरणार्‍या वाहनात बसून प्रवास करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT