पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 25 हजार 218 प्रकरणे
निकाली काढण्यात आली. सर्वाधिक 14 हजार 514 प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्हा राज्यात प्रथमस्थानी आला आहे.
मागील सात राष्ट्रीय लोकअदालतीत सात लाखांपेक्षा अधिक दाखल व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख आणि सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या लोकअदालतीत न्यायालयात दाखलपूर्व आणि प्रलंबित असे एकूण 1 लाख 40 हजार 682 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. सुनावणीसाठी न्यायाधीश व तज्ज्ञ वकिलांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. 25 हजार 218 दावे निकाली काढून, 84 कोटी 53 लाख 79 हजार रुपयांची भरपाई वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.
अमृत वर्षातील जोडप्याचे पुन्हा मनोमिलन
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षात वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केलेल्या पत्नीने पतीविरोधात दाखल केलेला वाद सामंजस्याने मिटल्याचा योग लोकअदालतीत जुळून आला. या पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दावा दाखल केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांच्या न्यायालयात हे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले. न्यायाधीशांनी या प्रकरणात सामंजस्याने तडजोड घडवून आणली. त्यानंतर पतीने पत्नीला नांदायला नेण्याची तयारी दर्शवली.
न्यायालयात प्रलंबित असलेली, तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येतात. त्यामुळे पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते, तसेच न्यायालयांवरील ताण कमी होतो. आगामी लोकअदालत 12 नोव्हेंबर रोजी असून, त्यामध्ये अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होत सामंजस्याने व तडजोडीने प्रकरणे निकाली काढून घ्यावीत.
– मंगल कश्यप, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण