पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेची प्रतीक्षा करत पुणे रेल्वे स्थानक परिसरात बसणारे उत्तरेकडील प्रवासी गुरुवारी पावसामुळे स्थानकात बसले होते. त्यामुळे कधी नव्हे इतके पुणे रेल्वे स्थानक गुरुवारी प्रवाशांच्या गर्दीने भरगच्च भरले होते. गुरुवारी सकाळी पावसाने सकाळच्या सुमारास काहीशी उघडीप घेतली होती. त्यामुळे अनेक प्रवासी आटोपून गुरुवारी रेल्वेच्या प्रवासाला निघाले खरे, मात्र दुपारी 4 नंतर प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
रिक्षा, टॅक्सीतून उतरल्यानंतर सामानाच्या बॅगा हाती घेऊन प्रवाशांना रेल्वे स्थानकाकडे भिजतच पळावे लागले. परिणामी, सर्वच गाड्यांचे प्रवासी एकाच वेळी स्थानकावर आल्यामुळे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पावसाचा कोणत्याही गाडीवर परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी पुणे विभागातून धावणार्या रेल्वेच्या गाड्या सुरळीतपणे नियोजित वेळेत धावत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांची कसरत
दोन-तीन दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे स्वारगेट एसटी स्थानकातदेखील ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्डयांमध्ये साचलेल्या पाण्यातून सामानाच्या बॅगा घेऊन जाताना एसटी प्रवाशांना गुरुवारी मोठी कसरत करावी लागली. (सर्व छायाचित्रे ः अनंत टोले)