पुणे

रॅगिंगप्रकरणी ससूनच्या डीनचा अजब खुलासा; रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन महिन्यांमध्ये रॅगिंगचे दोन प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे ससून प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, आता घूमजाव करत ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी रॅगिंगचा प्रकार घडलाच नसल्याचा अजब खुलासा केला आहे. त्यामुळे रॅगिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दोन दिवसांपूर्वी तरुणींकडून तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू केल्याचे सांगितले.

त्यानंतर, काय कारवाई करणार याबाबत पत्रकारांकडून सातत्याने विचारणा झाल्यावर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयात दुपारी 3 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान रॅगिंगसंदर्भात आधी मार्ड संघटनेच्या सदस्यांची आणि त्यानंतर सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. तरीही, डॉ. काळे यांनी याबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यलयात क्ष-किरणशास्त्र (रेडिओलॉजी) आणि भूलशास्त्र (अ‍ॅनेस्थेसिया) या विभागांत पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या दोन महिला निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यातील एक प्रकार हा मार्चमध्ये तर दुसरा रॅगिंगचा प्रकार हा गेल्या आठवड्यात घडला आहे. याप्रकरणी संबंधित महिला निवासी डॉक्टरांनी ससून रुग्णालयाकडे तक्रार केली असता रॅगिंग प्रतिबंधात्मक चौकशी समितीने या दोन्ही प्रकरणांची चौकशी केली आहे. त्यापैकी एका चौकशीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठवला आहे.

एक उघड; दुसर्‍याची सारवासारव

एका रॅगिंग प्रकरणातील विद्यार्थिनी एका शहरातील उपायुक्तांची मुलगी असल्याने हे प्रकरण समोर आले. विद्यार्थिनीने रॅगिंग होत असल्याचे सर्व पुरावे प्रशासनासमोर सादर केले. त्यामुळे याबाबत चौकशी करणे प्रशासनाला भाग पडले. अन्यथा, दुसर्‍या प्रकरणात केवळ अंतर्गत वादामुळे गैरसमज झाल्याची सारवासारव ससून प्रशासनाकडून केली जात आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

या दोन्ही विद्यार्थिनींनी नेमकी काय तक्रार केली आहे, समितीने केलेल्या चौकशीमध्ये काय आढळून आले याची माहिती देण्यास बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT