पुणे

राहू येथे वन जमिनीवरील अतिक्रमण काढले

अमृता चौगुले

राहू : पुढारी वृत्तसेवा: राहू (ता. दौड) येथील वन विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणावर शुक्रवारी (दि.1) मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये वन विभागाच्या दौंड, बारामती, इंदापूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील सुमारे शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून कारवाई सुरू केली होती. वन विभागाच्या हद्दीमधील ऊसतोड कामगारांच्या झोपड्या, पिके, वीटभट्ट्या आदी दहा जेसीबी यंत्रांच्या साह्याने काढल्या.

राहू तालुका दौंड येथील गट क्रमांक 851, 825, 826, 841 आदी ठिकाणी काही लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप केले होते. त्यामध्ये वाटप केलेल्या जमिनीपेक्षा सुमारे अठरा हेक्टरपेक्षा अधिक जमिनीमध्ये अतिक्रमण करून पिके घेणा-या शेतकर्‍यांचेही अतिक्रमण काढून टाकले. वन विभागाच्या जागेत जाता येऊ नये यासाठी चरही घेतले. यामध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जलवाहिनी फुटल्या. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, मयुर बोटे, इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी, बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, कल्याणी गोडसे आदींसह वनकर्मचा-यांनी कारवाईत सहभाग घेतला.

कारवाईने पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होेत आहे. बेट परिसरातील वन विभागाच्या जमिनींवर असलेले अतिक्रमण कधी काढणार? असा सवालही होत आहे. वन विभागाचे स्थानिक कर्मचा-यांनी चिरिमिरी घेत कामे केल्यामुळे हे अतिक्रमण वाढल्याचे सांगितले जात असून वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. वन विभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करण्यात आल्याबद्दल संबंधित शेतकरी अथवा इतर नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत लेखी पत्रव्यवहार सुमारे तीन वर्षापासून सुरू असून संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली. ही कारवाई आणखी दोन ते तीन दिवस चालणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

भूमिहीन शेतकर्‍यांना वाटप केलेल्या जमिनीमधील कायदेशीर तरतुदीमुळे आम्ही शुल्क किंवा कर भरू न शकल्यामुळे आमच्या जमिनी जात असल्याचे दुःख होत आहे. वन विभागाने शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करावा.

                                                                                           – दीपक जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT