पुणे

राहु : अतिउच्चदाब वाहिनीवरून वीजपुरवठा धोकादायक! शेतकर्‍यांकडून शंका व्यक्त

अमृता चौगुले

राहु; पुढारी वृत्तसेवा: मिरवडी (ता. दौंड) येथील एका खासगी औद्योगिक कंपनीसाठी नव्याने प्रस्तावित असलेली अतिउच्चदाब वाहिनी शेतकर्‍यांसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याची शक्यता शेतकरी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. या कारखान्यास याच अतिउच्चदाब वाहिनीवरून विद्युत पुरवठा केल्यास शेतकर्‍यांना कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या नांदूर, सहजपूर औद्योगिक पट्टा व दहिटणे येथील सबस्टेशनसाठी या उच्च दाबवाहिनीद्वारे पुरवठा केला जातो. या नव्याने विकसित होत असलेल्या कारखान्यासाठी जवळपास दोन मेगावॅट विजेची आवश्यकता आहे.

तर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या शेजारी असणार्‍या एका दूधभुकटी प्रकल्पासाठीही महावितरणने यापूर्वीच जवळपास एक ते दीड मेगावॅट विजेची मंजुरी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित नवीन कारखान्यास महावितरणने विजेच्या आवश्यक मागणीचा विचार करून मंजुरी दिल्यास या परिसरातील शेतकर्‍यांचे कृषिपंप अथवा इतर अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यामध्ये शेतकर्‍यांना पाण्याच्या आवर्तनाची गरज मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे विजेची मागणीही अनेकदा वाढते. तसेच घरगुती वापरही वाढलेला असतो, अशा काळात चालू वीजवाहिनीवर संबंध कारखान्यास वीज देणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. वीज कमी दाबाने उपलब्ध झाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे कृषिपंप अथवा इतरही घरगुती उपकरणे जळत असल्याच्या घटना घडतात.

नव्याने विद्युतवाहिनी करणे गरजेचे
महावितरणच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, संबंधित नवीन कारखानदारास वीज देणे गरजेचे आहे. परंतु सहजपूर, नांदूर औद्योगिक पट्टा व दहिटणेतील ऊर्जा केंद्र यासाठी अतिउच्च दाब वाहिनी आहेत, त्याच वाहिनीवर वीजपुरवठा देणे शक्य नाही, त्यासाठी नव्याने विद्युतवाहिनी करणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT