पुणे

राष्ट्रवादीने मागितलेल्या चारही जागा दिल्या; आशिष शेलारांच विधान चर्चेत

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महायुतीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या आहेत. त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा त्यांना दिल्या, असा दावा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. महायुतीने आयोजिलेल्या 'युवा मनकी बात' या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, युवासेनेचे सचिव किरण साळी, भाजयुमोचे शहराध्यक्ष करण मिसाळ, महायुतीचे पुणे समन्वयक संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते.

महायुतीतील जागावाटपात भाजपने मित्रपक्षांवर अन्याय केल्याबाबत विचारणा केली असता शेलार बोलत होते. ते म्हणाले की, जागावाटपाचा निर्णय पक्षाची आणि उमेदवाराची जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितरीत्या घेतला आहे. शेलार म्हणाले की, बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बाहेरचे म्हटलेले जनतेला रुचलेले नाही. त्यांनी तसे म्हणावयास नको होते. शिवसेनेचा गड असलेल्या कोकणातून शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणुकीत दिसणार नाही, याबाबत विचारले असता शेलार म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी बैठकीत चर्चा करूनच जागावाटप केल्याने त्याबाबत मतभेद नाहीत.

तरुणांचा जाहीरनामा

'युवा मनकी बात' कार्यक्रमानिमित्त युवकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा, सूचना संकलित करून युवकांच्या विकासाचा जाहीरनामा तयार करणार असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले. त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले असून, त्याद्वारे शाळा, महाविद्यालयस्तरावरील विद्यार्थ्यांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT