गणेश विनोदे : वडगाव मावळ : राज्यात घडलेल्या सत्तेच्या राजकीय घडामोडींचा परिणाम भाजप-राष्ट्रवादीचा संघर्ष असलेल्या मावळ तालुक्यातही जाणवू लागला आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मावळात राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली तर सलग 25 वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला मात्र चांगलाच धक्का बसला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत सातत्याने एकमेकांशी संघर्ष करणार्या राष्ट्रवादी व भाजपचा संघर्ष राज्यात घडलेल्या सत्तांतरामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
आमदार सुनील शेळके यांच्या रूपाने सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आणि तब्बल 25 वर्षांनी मावळात सत्ताबदल झाला. आमदार शेळके यांनी गेल्या दोन वर्षांत तब्बल 1 हजार कोटींचा निधी आणला. एकीकडे गतिमान विकास करत असताना दुसरीकडे पक्ष संघटनेमध्ये बदल करून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. दरम्यान, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीत राज्याची सत्ता भाजपच्या ताब्यात गेल्याने राष्ट्रवादीच्या गेल्या दोन वर्षांत सुरू असलेल्या भरारीला कुठेतरी ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या सत्तांतराचा परिणाम मावळात येणार्या निधीवर मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. याशिवाय पालकमंत्रीही बदलणार असल्याने शासकीय समित्या बरखास्त होणार आहेत.
भाजप
माजी राज्यमंत्री संजय भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे यांच्या माध्यमातून 25 वर्षे मावळात भाजपची सत्ता होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मावळला सुमारे 1400 कोटींचा निधी मिळाला. परंतु, दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपच्या या रौप्यमहोत्सवी सत्तेला ब्रेक लागला.
तालुक्यात नगरपरिषदा, पंचायत समिती, आमदारकी तसेच राज्य आणि देश अशी गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने भाजपची घौडदौड अतिशय गतिमान पद्धतीने सुरू होती. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ही गतिमान घोडदौड सन 2019 मध्ये झालेल्या पराभवामुळे रोखली गेली आणि 25 वर्षांनंतर भाजपचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. आता या सत्तातरामुळे संघटनेला आणखी ताकद मिळण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री भेगडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबंध असल्यामुळे तालुक्यात विरोधात असूनही या संबंधाच्या व सत्तेच्या जोरावर पक्षाला खूप फायदा होऊ शकतो.
शिवसेना
मावळात शिवसेनेची ताकद कमी असली तरी पक्षाचे अस्तित्व मात्र वर्षांनुवर्षे टिकून आहे. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना तालुक्यात व राज्यात सत्तेत होती. परंतु, अपेक्षेप्रमाणे याचा फायदा शिवसेना पक्ष वाढीला झाला नाही. पक्ष संघटना टिकवून ठेवण्यात मात्र यश आले. या काळात पंचायत समितीमध्येही उपसभापती सारखे प्रमुख पद भूषवण्याची संधी पक्षाला मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या निकषानुसार जिल्हा नियोजन समिती तसेच विविध शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आता राज्यात प्रामुख्याने शिवसेनेत घडलेल्या घडामोडींमुळे सर्वांचेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
काँग्रेस
गेल्या 25 वर्षांत सत्तेत नाही. तरीही ठराविक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटना अजूनही टिकून आहे.
सत्तेत नसली तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादीला फायदा झाला. परंतु, काँग्रेसला मात्र गेल्या 25 वर्षांत काहीच मिळाले नाही. कित्येक वर्षे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही काँग्रेसचा प्रतिनिधी नाही. सत्ता नसल्याने कुठल्या समितीवरही संधी नाही.
गेल्या दोन वर्षांत मात्र महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा रुबाब वाढला होता. आता मात्र सत्तांतरामुळे मावळात काँग्रेस पुन्हा पूर्वपदावर येणार आहे.