पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. मात्र पुरवठ्यात गोंधळ झाला. राज्यातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. मात्र, काही ठिकाणी पाठ्यपुस्तके गरजेपेक्षा कमी मिळाली, तर काही ठिकाणी पुस्तके शिल्लक राहिल्याचे निदर्शनास आले, तर मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा केल्याचे बालभारतीकडून सांगण्यात आले.
शालेय शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याअंतर्गत यंदा 5 कोटी 40 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार होता. बालभारतीकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले, तर खुल्या बाजारातही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी काही ठिकाणी पुस्तके पुरेशी नव्हती, तर काही ठिकाणी पुस्तके शिल्लक राहिल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नोंदविलेल्या मागणीनुसार 5 कोटी 40 लाख पुस्तकांचा पुरवठा पूर्ण झाला आहे. खुल्या बाजारपेठेसाठीची आवश्यक पुस्तके बालभारतीच्या गोदामांमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती बालभारतीच्या अधिकार्यांनी दिली. तर आदर्श शाळांच्या तयार करण्यात येत असलेल्या नव्या पुस्तकांतील भाग तीन आणि चार या पुस्तकांचे वितरण बाकी आहे. ते येत्या महिनाभरात पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बालभारतीकडे जेवढ्या पुस्तकांची मागणी करण्यात आली होती तेवढी पुस्तके तयार करून 31 मे रोजीच पाठविण्यात आली आहेत. बाजारात पुस्तकांचा तुटवडा असेल तर विक्रेते, सामान्य नागरिक यांना बालभारतीच्या भांडारात जाऊन पुस्तके विकत घेता येतील. बालभारतीकडे पुस्तकांचा साठा उपलब्ध आहे.
– कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती
हेही वाचा