पुणे

राज्यात आयटीआयचे 70 टक्के प्रवेश; पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नव्याने प्रवेशप्रक्रिया

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आत्तापर्यंत तब्बल 70 टक्के प्रवेश झाले आहेत. तरीदेखील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत.

यंदा राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून प्रवेशासाठी 1 लाख 50 हजार 116 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 लाख 5 हजार 672 जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी 7 ते 11 सप्टेंबरची मुदत आहे.

शासकीय आणि खासगी आयटीआयमधील जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. 11 सप्टेंबरला प्रवेश फेरीसाठीच्या उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. 12 सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपस्थित विद्यार्थ्यांतून संस्था स्तरावर गुणवत्ता यादी 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशासाठी बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
शासकीय आयटीआय
उपलब्ध जागा – 94620
आयटीआयमध्ये प्रवेश – 83591
प्रवेशासाठी रिक्त जागा – 11029
खासगी आयटीआय
उपलब्ध जागा – 55496
आयटीआयमध्ये प्रवेश- 22081
प्रवेशासाठी रिक्त जागा-33415
एकूण जागा – 150116
एकूण प्रवेश – 105672
एकूण रिक्त जागा – 44444

SCROLL FOR NEXT