पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट प्रक्रियेसाठी आता ऑनलाइन वेबप्रणाली सुरू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी येत्या आठवड्यात होणार आहे. प्रशासन सुरुवातीला याची चाचणी घेईल, त्यानंतर या सुविधेचा पर्यटकांना लाभ घेता येईल. वीकेंडला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पर्यटकांना तिकीट घेण्यासाठी दोन ते तीन तास रांगेतच उभे राहावे लागते. मात्र, आता रांगेत उभे राहावे लागणार नाही. प्राणिसंग्रहालयाची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार झाली असून, त्यामुळे पर्यटकांना आता घरबसल्या तिकीट काढता येणार आहे.
प्रशासनाकडून रविवारीच (दि. 12) याची चाचणी करण्याचे नियोजन होते. परंतु, पर्यटकांची रविवारी असलेली गर्दी लक्षात घेता, त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय बदलून आता येत्या आठवड्यात या ऑनलाईन प्रणालीची चाचणी करण्यात येणार आहे. या प्रणालीकरिता प्राणिसंग्रहालय प्रशासनाला सुमारे 15 लाख रूपयांपर्यंत खर्च आला आहे.या प्रणालीद्वारे शाळा, संस्था किंवा पर्यटकांना ग्रुप बुकिंग ऑनलाईन करता येणार आहे. फोटो काढण्यासाठीची तसेच प्राणिसंग्रहालयावर अभ्यास करण्यासाठीच्या परवानगीचा यात समावेश आहे. यासोबतच पर्यटकांना या प्रणालीवर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची इत्यंभूत माहितीसुद्धा मिळणार आहे.
चित्रपटाचे तिकीट आता ज्याप्रमाणे घरबसल्या ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्याप्रमाणेच पर्यटकांना राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे तिकीट घरातूनच मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून काढता येणार आहे. तिकीट बुक झाल्यावर पर्यटकांना एक क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड प्रवेशद्वारावर स्कॅन केल्यावर पर्यटकांना प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळणार आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे जागतिक स्तरावरील प्राणिसंग्रहालय म्हणून विकसित होत आहे. त्या अनुषंगाने प्राणी संग्रहालयाची स्वतंत्र वेब प्रणाली स्वतंत्र प्रणाली निर्माण करण्यात आली असून, येत्या आठवड्यात याची चाचणी करण्यात येणार आहे.
– डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय