येरवडा; पुढारी वृत्तसेवा: विश्रांतवाडी येथील दुय्यम नोंदणी कार्यालयातील नियमबाह्य दस्तनोंदणीप्रकरणी लिपीक तथा तत्कालीन प्रभारी दुय्यम निबंधक अमित अविनाश राऊत याला त्याने केलेल्या कृत्याप्रकरणी म्हणणे मांडण्याची नोटीस देण्यात आली आहे. अदयाप तरी राऊत याने म्हणणे मांडले नसल्याची माहिती मुख्यालयाचे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी दिली. राऊत याने त्याच्याकडील प्रभारी सहायक दुय्यम निबंधकपदाचा शेवटच्या दिवशी 8 आगस्टला तुकडे बंदी कायद्याचे नियमाचे उल्लंघन करीत 24 नियमबाह्य दस्त नोंदविले असल्याचे सहायक जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
या प्रकारानंतर अमित राऊत हा सुट्टीवर गेला आहे. अमित राऊत यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत नोंदणी उपमहनिरीक्षक गोविंद कराड यांना विचारले असता ते म्हणाले, की अमित राऊत याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर त्यास त्याचे म्हणणे मांडण्याची नोटीस दिली होती. त्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत त्याच्यावर कठोर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.
या प्रकरणात राऊत याच्याबरोबर आणखी काही वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत का, याचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे कराड यांनी सांगितले. दरम्यान, राऊत याने यापूर्वी आपल्या पदाचा गैरवापर करून दापोडी येथे नियमबाह्य दस्तनोंदणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर राऊत हा सहा महिने त्या वेळीदेखील गायब होता. दरम्यान, राऊत याला बडतर्फ करावे, असे पत्र नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांना सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेख यांनी दिले आहे.