पुणे : पुढारी वृत्तसेवा : दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पालिकेच्या प्रशासकीय कारकीर्दीत झालेल्या रस्त्याची कामे सुमार दर्जाची झाल्याचे निदर्शनास आले आहे. कारण शहरातील बहुतांश रस्त्यावरील खडी विखुरली गेली असून, खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अशा रस्त्यातून मार्गस्थ होताना मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
औंध रस्ता : रेंजहिल्स, बोपोडी आणि खडकीमध्ये झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण, आता औंध रस्त्यावरही झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या असून, काही ठिकाणी तर खड्ड्यांमधून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी तर यामुळे वाहतूक कोंडी होत असून, याला वाहनचालक वैतागले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी केली आहे. औंध रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या तशी नवीन नाही. पावसाळ्यात तर वाहनचालकांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून, आता पावसाचा जोर वाढल्यामुळे येथे खड्ड्यांत खूप पाणी साचत आहे. त्यातून वाहन काढणेही चालकांना कठीण होत आहे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन आधीच हे खड्डे महापालिकेने बुजवायला हवे होते.
वाहनचालक अमित सोनावणे म्हणाले, 'मी रोज नोकरीनिमित्त डेक्कनला जाताना येथून ये-जा करतो. परंतु, एरवीसुद्धा येथे असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण होते. पावसाळ्यात मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आताही या अडचणी येतच असून, हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत.'