पुणे

रसायनमिश्रित सांडपाणी उघड्यावर, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी सुरू केला सपाटा

अमृता चौगुले

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील रसायन कंपन्यांनी पावसाच्या पाण्याबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी पुन्हा उघड्यावर सोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. कुरकुंभ, पांढरेवाडी हद्दीतून जाणारा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यामुळे काही दिवसांपासून जलमय झाला आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील बहुतांश रसायन कंपन्या शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून उद्योग चालवतात.

कंपन्यांचे प्रदूषण तसेच सांडपाण्याचा प्रश्न ही येथील मुख्य व भीषण समस्या आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक लहान-मोठ्या कंपन्या सांडपाण्याचा मोठा साठा करतात. मुसळधार पाऊस होईल त्या वेळी पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी सोडून देतात. यामुळे नेमके सांडपाणी कोणत्या कंपनीचे, हे शोधणे अवघड होते. पावसाळ्यात हा उद्योग वारंवार सुरू असतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुध्द करण्यासाठी मोठा खर्च होतो. तो खर्च टाळण्यासाठी हे कृत्य केले जाते. मात्र, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

शुक्रवारी (दि. 5) संध्याकाळी परिसरात झालेल्या मुसळधार पावसात काही कंपन्यांनी सांडपाणी सोडून दिल्याने परिसरात उग्र दुर्गंधी पसरली होती. महामार्गावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महामार्गालगत असलेल्या गटारी केमिकलमिश्रित दूषित सांडपाण्याने कायम भरलेली असतात. महामार्गावरील पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. लहान वाहने बंद पडत होती. दूषित पाण्यामुळे अंग खाजणे, आग होणे, अशा प्रकारचे त्रास होत असल्याचे नागरिक सांगत होते.

SCROLL FOR NEXT