पुणे : पुढारी वत्तसेवा: 'रवी परांजपे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. चित्रकलेसह ते उत्तम लेखक होते. त्यांचे चित्रकलेतील योगदान विसरता येणार नाही. ते प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व होते,' अशा शब्दांत चित्रकला क्षेत्रातील दिग्गजांनी रवी परांजपे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे शनिवारी निधन झाले. दिग्गजांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यासारखा चित्रकार होणे नाही, अशी भावना व्यक्त केली.
शि. द. फडणीस : रवी परांजपे हे बेळगावमधील प्रख्यात चित्रकार के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य होते. बेळगावनंतर मुंबईत त्यांनी चित्रकलेचा वेगळा ठसा उमटवला. त्यांचा वास्तववादी रेखाटनावर भर होता. उत्तम आणि प्रमाणबद्ध रेषा हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. ते उत्तम दर्जाचे स्थापत्यकला रेखाटक होते. सौंदर्यवादी कलेविषयी त्यांचा आग्रह होता. चित्रकलेसह ते उत्तम लेखक होते. त्यांचे चित्रकलेतील योगदान विसरता येणार नाही.
मारुती पाटील : परांजपे यांचे चित्रकला क्षेत्रात योगदान खूप मोठे आहे. त्यांनी अॅक्रेलिक, ऑईल….यासारख्या सर्व माध्यमांत काम केले आहे. त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. कुठलेही चित्र ते सुंदर पद्धतीने मांडायचे. त्यांची शैली कॉपी करायचे म्हटले तर कोणालाच जमले नाही. त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील चांगल्या कलाकारांना गुणिजन पुरस्काराने गौरविले. माझाही या पुरस्काराने गौरव झाला.
चंद्रमोहन कुलकर्णी : बेळगाव-मुंबई- पुणे असा जो त्यांचा कलेचा, जीवनाचा प्रवास झाला तो खूप महत्त्वाचा आहे.
मुंबईत त्यांनी जाहिरात क्षेत्रात मोठे काम केले. चित्रकलेतून सौंदर्यवादी विचार मांडला. ती शैली त्यांनी सतत जोपासली. चित्रकला आणि जाहिरात क्षेत्रातील मोठा काळ अनुभवलेला चित्रकार आज आपण गमावला. त्यांनी पुष्कळ विद्यार्थी घडविले. त्यांची उंची कोणालाच गाठता आली नाही. माझ्या मनात परांजपे सरांविषयी प्रेमाचा कोपरा आहे.
रवी मुकुल : विद्यार्थी असल्यापासून रवी परांजपे यांची चित्रे मी पाहत आलो आहे. एक वेगळी शैली असलेले ते चित्रकार होते. त्यांच्या चित्रातील रंगसंगती खूप वेगळ्या धाटणीची होती. त्यांची चित्रे जाणकारांपासून सामान्य रसिकांपर्यंत सर्वांना भावणारी होती, ती नाळ त्यांनी जोडली.
चारुहास पंडित : रवी परांजपे यांच्या चित्रांशी माझी ओळख झाली ती महाविद्यालयात असताना…त्यांची वेगळी शैली होती. ते नेहमीच्या पठडीच्या पलीकडे जाऊन चित्र रेखाटायचे. मी चित्रकलेचा विद्यार्थी होतो तेव्हापासून त्यांच्या चित्रांचे वेड लागले. जाहिराती, कॅलेंडर्स यासह स्थापत्यकलेतील रेखाटन ते करायचे. त्यावेळी त्यांनी स्वत:चा नवीन पायंडा निर्माण केला. आमच्या पिढीचे आणि आमच्या पुढील पिढीचे चित्रकार त्यांच्याकडून प्रोत्साहित झाले. ते नाहीत हा कलाविश्वाला मोठा धक्का आहे.
मिलिंद मुळीक : रवी परांजपे यांचा वरदहस्त हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. माझे वडील आणि परांजपे सर मित्र होते. त्यामुळे लहानपणी वडिलांसोबत सरांच्या स्टुडिओत जाणे व्हायचे. त्यांची कॅलेंडरसाठीची चित्रे पाहून मी अत्यंत प्रभावित व्हायचो. ते आर्वजून मला त्यांची चित्रे दाखवायचे. प्रवासात पुढे जाताना मी काढलेली चित्रे त्यांना नेहमी दाखवायचो. त्यांनी चित्रकलेच्या अनेक बाबी मला शिकवल्या, मार्गदर्शन केले. माझ्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.