पुणे

योजनांना गती देण्यासाठी निविदा प्रक्रियेत बदल करा आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात मागणी

अमृता चौगुले

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी (दि. 21) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील पाणी योजना ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे तर कामशेत-खडकाळा आणि पाटण नळ पाणीपुरवठा योजना निविदा प्रक्रियेमुळे रखडल्या असून, या योजनांना गती देण्यासाठी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व निविदा प्रक्रियेत बदल करावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली.

तळेगाव दाभाडे शहरातील पाणी योजनेच्या कामास अनेक वर्षांपासून दिरंगाई होत असुन ठेकेदार गांभीर्याने काम करीत नाही. तसेच कामशेत, पाटण या योजनांसह इतर अनेक योजनांची एकत्रितपणे निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे या कामांसाठी ठेकेदार मिळालेले नाहीत. यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या, परंतु त्यास देखील प्रतिसाद मिळाला नाही. या योजनांना विलंब होत असल्यामुळे कामशेत, पाटणसह, सदापुर, देवले, भाजे, बोरज, दुधीवरे, शिंदगाव, औंढे-औंढोली या संबंधित गावांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

जर या योजना विभक्त करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.तर ठेकेदार काम करण्यासाठी पुढे येऊ शकतात व या प्रलंबित योजनांच्या कामाला गती मिळू शकेल. असा मुद्दा उपस्थित करून आपण यावर काही निर्णय घेणार आहात का ? असा सवाल आमदार शेळके यांनी केला. दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर बोलताना सभागृहाची वेळ संपल्यानंतर दालनात प्रत्यक्ष भेटून आजच्या आज या विषयावर मार्ग काढू असे सांगितले. याबाबत मार्ग निघाल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पाणी योजनांची निविदा प्रक्रिया होऊन कामास गती मिळेल व संबंधित गावांमधील पाणी प्रश्न सुटेल असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT