पुणे

येरवडा : नियमबाह्य दस्तनोंदणी भोवणार

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: विश्रांतवाडी येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सब रजिस्टार अमित अविनाश राऊत यांनी केलेल्या नियमबाह्य नोंदणी प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार लवकरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली. विश्रांतवाडी येथील सहदुय्यम निबंधक वर्ग 1, हवेली क्रमाक 8 या कार्यालयात प्रभारी सब रजिस्टार अमित अविनाश राऊत यांनी 24 नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाबाबतचा चौकशी अहवाल सह जिल्हा निबंधक (जेडीआर) कार्यालयाकडून नोंदणी उप महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

त्यानंतर उपमहानिरीक्षक दीपक सोनवणे यांनी पुढील कारवाईसाठी नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) कार्यालयास कळविले होते.
राऊत यांच्याकडे विश्रांतवाडी येथील दुय्यम निबंधकाचा प्रभारी कार्यभार होता. कार्यभार संपण्याच्या शेवटच्या दिवसी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये 44 नियमबाह्य नोंदणी केल्याची तक्रार होती. यानंतर सहजिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी पाठविलेल्या चौकशी अहवालात 24 प्रकरणे नियमबाह्य झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यावरून अनेक ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयात एक दोन गुंठ्याची खरेदी खते, अनधिकृत बांधकामाची फ्लॅट खरेदीची दस्त नोंदविली जात असल्याचे समोर आले आहे.

दस्तांची नोंदणी रद्द करण्याची मागणी
विश्रांतवाडी कार्यालयातील तत्कालीन प्रभारी अमित राऊत यांनी शेवटच्या दिवशी नियमबाह्य नोंदणी करून करोडो रुपये घेऊन वकील, एजंट यांच्याकडून करोडो रुपये गोळा केल्याची चर्चा रंगली आहे. शासनाचा महसूल बुडवून राऊत यांनी नियमबाह्य दस्त नोंदणी केली असल्याने त्यांनी केलेल्या दस्तांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे नियमबाह्य नोंदणी करून घेणार्‍या वकील, डेव्हलपर्स, एजंट यांचेदेखील धाबे दणाणले आहेत.

उपमहानिरीक्षक दीपक सोनवणे यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला असून, अमित राऊत यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

                                                  – श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक

SCROLL FOR NEXT