पुणे

मोशीतील भारतमाता चौकात खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताची भीती

अमृता चौगुले

मोशी : परिसरात पावसाचे आगमन होताच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसत आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मोशी परिसरातील पावसामुळे ठिकठिकणी खड्डे पडलेले दिसत आहेत. प्रामुख्याने भारतमाता चौकात पडलेले खड्डे अपघातला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी वाहने घसरण्याचे प्रमाणदेखील वाढल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देहू-आळंदी रस्त्यावर मॉर्डन कॉलेज भागात, लक्ष्मीमाता चौक, नाशिक महामार्गावर भारतमाता चौक, शिवाजीवाडी चौकात खड्डे पडलेले दिसून येत आहेत.आल्हाटवाडी रस्त्यावरदेखील काही ठिकाणे खड्डे पडले आहेत.

या खड्डयांमधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिका व संबंधित प्रशासनाचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. जादातर खड्डे हे केबल टाकण्याच्या कामामुळे पडले असून चांगल्या रस्त्यांची या कामांमुळे वाट लागल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून ही डबकी अपघाताला निमंत्रण देत आहेत. महामार्गालगतची बांधकामे गेल्या काही महिन्यांत पाडण्यात आली असून त्याचा राडारोडादेखील रस्त्यालगत पडलेला दिसत आहे. साईट पट्ट्यादेखील गायब झाल्या असून मोठ्या प्रमाणात माती वाहून महामार्गावर येण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT