पुणे

मोशी येथे साकारतेय निसर्गबेट

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात सहज जलबोध अभियान अंतर्गत 'निसर्गबेट' ही संकल्पना प्रत्यक्ष कृती कार्यक्रमातून सर्वांसमोर ठेवत आता मोशी येथे निसर्गबेट उभारण्यात येणार आहे. यापूर्वी दुर्गाटेकडी पायथा भागात असे घनवन उभारण्यात आले आहे. सध्या शहरीकरणामुळे हरीत पट्टा कमी होत आहे. या परिस्थितीत शहरातील हरित आच्छादन वाढवणे आवश्यक आहे. तापमानवाढ रोखणे शक्य होणार आहे. या उद्देशाने हरित आच्छादन वाढविण्याच्या हा उपक्रम घेण्यात येत आहे.

सध्या भोसरी जवळ वाळके मळा परिसरात विजय वाळके यांच्या जमिनीवर यावर्षी बृहद् पंचवटी संकल्पनेनुसार 100 पेक्षा जास्त वनस्पती प्रजातींची लागवड आणि स्थानिक पातळीवर जलसंधारण रचना संकल्पातून निसर्गबेट उभे राहत आहे. याव्यतिरिक्त इंद्रायणीनगर येथील सर्कल परिसरातही निसर्गबेट पद्धतीने वनीकरण सुरू आहे.

बाणेर -सूस टेकडी, दिघीजवळील दत्तगड, याठिकाणी निसर्गबेट संकल्पनेत अंतर्भाव असणार्‍या झिरपा कुंभ, भैरो तलाव, पंचस्तरीय वृक्ष लागवड अशा संकल्पना नागरिकांना प्रत्यक्ष अभ्यासण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय सहज जलबोध अभियान अंतर्गत वृक्ष लागवड आणि जलसंधारण विषयावरील तांत्रिकता समजून घेण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे देखील आयोजित केली जातात.

वृक्ष लागवड मोहिमांत शास्त्रीय दृष्टिकोन जपणे कसे आवश्यक आहे, हे पर्यावरणप्रेमींना पटवून देण्यासाठी राज्यभरात पर्यावरण साक्षरता मोहीम सुरू आहे. गेल्या काही वर्षांत मियावाकी, घनवन, देवराई अशा नावांचा वापर करून अशास्त्रीय आणि अव्यवहार्य संकल्पना लोकांच्या माथी मारण्यात येत आहेत. यातून फक्त पैसा, परिश्रम आणि वेळ यांचे तर नुकसान होतच आहे; परंतु याहून मोठे नुकसान आहे ते म्हणजे समाजाचे शास्त्रीयतेकडे होणारे दुर्लक्ष.

मियावाकीबाबतचा फोलपणा उघड
मियावाकी आणि तत्सम पद्धतीत एका गुंठ्यासाठी 50 ते 75 हजार रुपये खर्च होतो. हे अतिशय अतार्किक आहेच. शिवाय अशा योजना शासकीय निधी तसेच 'सीएसआर'माध्यमातून राबविण्यात येत असल्याने हा जनतेच्या पैशांचा चुराडाच आहे. या पद्धतीत एका वर्षात होणारी वाढ दाखवून केलेली फसवणूक ही पाचव्या वर्षी सहजच उघडी पडते. सहज जलबोधकार परिचित उपेंद्र धोंडे यांनी यासंदर्भात शासनाशी सततपणे पाठपुरावा केला आहे. याआधी वनभवन, पुणे याठिकाणी झालेल्या बैठकीत त्यांनी अनेक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रशासनासमोर मियावाकी संदर्भातला फोलपणा दाखवून दिल्यानंतर अनेक निसर्गरक्षक संस्था व कार्यकर्ते आता या विषयातील तांत्रिकतेकडे वळले आहेत.

निसर्ग बेटामध्ये असलेली झाडे
वृक्ष : नारळ, संत्री, अंजीर, काजू, मोसंबी, बोर, काटे सावर, सीता अशोक, जांभूळ, आवळा, रतन गुंज, चुक्राशिया, सिंगापूर चेरी, पळस, पिंपळ, शेवगा , कौशी
आयुर्वेदिक : हाडजोड, शतावरी, मायाळू, गूळ वेल, कृष्ण कमळ, घायपात, स्नेक प्लांट, काळी हळद, मेहंदी, डुक्कर कंद, पान फुटी, लाल गुंज, सफेद गुंज, काळी गुंज, कडीपत्ता.
फुल झाडे: कामिनी, कुंती, पेंटास, अनंत, सदाफुली

शहरी भागातील भूजल पातळी आणि मोजक्याच उपलब्ध असणार्‍या हिरव्या टेकड्या याचा शास्त्रीय संबंध आहे आणि याबाबत शहरी नागरिकांनी साक्षर होणे गरजेचे आहे. निसर्गबेट कार्यशाळा आणि वनीकरणाची थेट उदाहरणे यातून आम्ही समाजाला पर्यावरण साक्षर करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
                             – उपेंद्र धोंडे, सहज जलबोधकार, भू-वैज्ञानिक जलशक्ती मंत्रालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT