श्रीकांत बोरावके
मोशी : नुकताच नव्या शाळेत नववीच्या वर्गात प्रवेश घेत कोरोनानंतर नव्या दमाने शिक्षणाचा श्रीगणेशा करणार्या विद्यार्थ्याचा गुरुवारी अकाली अपघाती मृत्यू झाला. ही घटना कशी घडली, हा पोलिस चौकशीचा भाग असला तरी एक प्रश्न मात्र आवर्जून उपस्थित होत आहे की महामार्ग अजून किती कोवळ्या जिवांचा जीव घेणार आहे.?
महामार्गावर ना सर्व्हिस रस्ता, ना वाहतुकीचे नियोजन आणि त्यात चौकात उड्डाण पूल नसल्यामुळे महामार्गावर गुरुवारी सायंकाळी चार वाजता आपली शाळा सुटल्यानंतर पायी चालत घरी निघालेल्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. शंभू काशीनाथ साठे (वय 13) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.तो मोशीतील नागेश्वर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता.
गुरुवारी शाळा सुटल्यानंतर भारत माता चौकात रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने त्याला उडविले यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या चौकात वाहने सिग्नलचे पालन करत नाहीत. देहू, आळंदी आणि चाकणवरून भोसरीवरून येणार्या वाहनांचा या चौकात संगम होतो. अपघात घडू नये यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. 'पुढे शाळा आहे वाहने हळू चालवा' असा बोर्ड तर कोणत्याच रस्त्यावर दिसत नाही. गतिरोधक नाहीत, पांढरे पट्टे गायब आहेत, सर्व्हिस रस्ता नाही, अशी परिस्थिती या महामार्गाची दिसत आहे. मुळात विद्यार्थ्यांना शाळेपुढे पादचारी पूल उभारला आहे; पण मोशी गावठाण, लक्ष्मीनगरकडे जाण्यासाठी पादचारी पूल नाही.
आळंदी आणि देहू रस्त्यावर पादचारी पुलच नाहीत. वाहनांचे अतिक्रमण भारतमाता चौकात दिसत आहे. येथे रिक्षा, मोठी वाहने उभी असतात. यामुळे रस्ता अरुंद होतेा. तसेच, अतिक्रमण कारवाई करण्यात येते. परंतु, त्यानंतर राडारोडा तसाच पडून असल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. चौकात सिग्नल लागलेला असतानादेखील आपली वाहने काढण्याची घाई करणार्या वाहनचालकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.
अपुरे पोलिस कर्मचारी, वाहतूक नियंत्रक या आणि अशा अनेक समस्यांनी भारतमाता चौक ग्रासला आहे. परंतु, याच अडचणींचा फटका कोवळ्या जीवांना बसत आहे. यावर आता सर्वच घटकांनी एकत्र येत विविध उपाययोजनांची मागणी करायला हवी आणि भविष्यात पुन्हा अशा घटना घडणारी नाहीत याची काळजी घ्यायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य मोशीकर नागरिकांकडून केली जात आहे.