पुणे

मोशी टोलनाकाविरोधात पिंपरी-चिंचवडकरांची एकजूट

अमृता चौगुले

मोशी : येथील टोलनाका पुन्हा सुरू करू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. अगोदर रस्ता रुंदीकरण विकासकामे, मगच टोल, अशी भूमिका पिंपरी-चिंचवडकरांनी घेतली आहे. तसेच, टोलनाका हटविण्यासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांची एकजूट दिसून येत आहे.

टोलनाका बंदची जोरदार मागणी; शहरात सोशल माध्यमांवर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी व चांडोली येथील टोलनाके सुरू होत असल्याची व त्याठिकाणी स्थानिकांनादेखील महिन्याला 315 रुपये सवलतीच्या पाससाठी पैसे भरावे लागणार असल्याचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. याची गुरुवारी (दि. 5) दिवसभर समाजमाध्यमांवर चर्चा होती.

आधी वाहतूक कोंडीतून सुटका करा

अनेक नागरिकांनी समाज माध्यमावर टोलनाका विरोधातील आपली भूमिका व्यक्त केल्या. अगोदर रस्ता रुंदीकरण करा मगच टोल सुरू करा, मोशी, भोसरी, चाकण, खेडच्या नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका करा मगच टोलनाका सुरू करा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिवसभर उमटताना दिसून आल्या. मुळात मुदत संपली असताना रस्त्याचे काम कोणतेही सुरू नसताना पुन्हा टोलवसुली कोणती व कशासाठी हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. या सर्व गोष्टींमागे काय गोलमाल आहे असाही तिरकस सवाल अनेकांनी उपस्थित केला.

भाजपची टोलबंद रहावा हिच भूमिका असून आमदार महेश लांडगे यांच्याकडे टोलनाका बंद करण्यासंदर्भात स्थानिकांच्या भावना पोहोचविल्या आहेत. येत्या काळात वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.
– सारिका बोर्‍हाडे,
माजी नगरसेविका, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस टोलनाका बंदच्या भूमिकेत अगोदरपासूनच आहे. नागरिकांना विश्वासात न घेता, सुविधा न देता पुन्हा सुरू केलेला टोलनाका आम्ही चालू देणार नाहीड़ येत्या काळात आंदोलनाची गरज लागली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत.
– वसंत बोराटे, माजी नगरसेवक,
राष्ट्रवादी काँग्रेस

चाकण एमआयडीसीत नोकरीसाठी जाणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात मोशीत राहण्यास आहे. त्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक व्यवसाय असणार्‍या आमच्या तरुणांनादेखील टोलनाक्यामुळे आर्थिक भुर्दंड पडणार आहे. रोज वाहतूककोंडीचा त्रास होत असताना त्यावर टोलनाक्याचा अजून भार का याचा विचार व्हावाड़ याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागणी केली आहे.
– निखिल बोर्‍हाडे, सामाजिक कार्यकर्ते

मोशीत कचरा डेपोचा त्रास त्यात आता सक्तीने वसुलीचा टोलनाका पुन्हा मोशीकरांच्या माथी मारला आहे. हा मोशीकरांवर अन्याय असून, त्या विरोधात तातडीने प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा मोशीकर आंदोलन कसे करतो हे वेगळे सांगण्याची गरज ना,ही हे प्रशासनाने यापूर्वी अनुभवलेले आहे.
– गणेश साहेबराव सस्ते, स्थानिक ग्रामस्थ, मोशी

SCROLL FOR NEXT