पुणे

मोदींनी संविधानाची कास धरावी : बाबा आढाव

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटल्याने मनातील अर्धा अंधार दूर झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची कास धरून राज्यकारभार करावा आणि मनातील राहिलेला अर्धा अंधार दूर करावा,' असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. बुधवार पेठ येथील हुतात्मा स्मारकापासून आज महागाई व तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मोर्चा काढला. हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यावर बाबा आढाव बोलत होते. न्या. बी. जे. कोळसे, अंकल सोनावणे, उषा मसलकर, शमसुद्दीन तांबोळी, हाजी नदाफ, वसंत साळवे, अजित अभ्यंकर, नीरज जैन, अ‍ॅड. मोहन वाडेकर, समितीचे निमंत्रक नितीन पवार, तमन्ना इनामदार यांच्यासह हमाल, तोलणार, काच पत्रा वेचक, रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक, मोलकरीण, अंगणवाडीताई आदी कष्टकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते.

डॉ. आढाव म्हणाले, 'ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नरेंद्र मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, त्या संघाने भारतीय राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधीही केला नाही. उलट 1947 ला आपल्या मुखपत्रातून राष्ट्रध्वजाची संघाने निंदा केली. त्याच संघाच्या मोदींना उपरती झालेली दिसते. पंतप्रधान म्हणून आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात राष्ट्रध्वजाचे महत्त्व त्यांना पटले आहे, असे वाटते. म्हणून त्यांनी 'हर घर तिरंगा' घोषणा दिली आहे. परंतु, फक्त हर घर तिरंगा ही घोषणा 'हर घर संविधान'शिवाय अपुरी आहे.'

'सध्या भारताचे संविधान बाजूला ठेवून मोदी-शहा यांच्या विचाराने देश चालवला जात आहे. आणीबाणीच्या काळात त्या वेळच्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाने जसा मिसा कायद्याचा दुरुपयोग केला आणि आपल्या विरोधकांना या कायद्याद्वारे जेलमध्ये टाकले, तशी आज या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. मिसा ऐवजी ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठीचे कारस्थान मोदी-शहा करीत आहेत. केंद्र सरकारच्या या लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधानविरोधी कारभाराचा जनतेने मूलभूत विषय घेऊन जाब विचारला पाहिजे,' असेही बाबा आढाव यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, 'पंतप्रधान 'अपने ही मन की बात' लोकांना ऐकवतात. जनतेचे अवघड झालेले जगणे त्यासंबंधीचे प्रश्न ऐकायला त्यांना वेळ नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या तोंडावर 'जन की बात' , केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 9 ते 15 ऑगस्ट क्रांती सप्ताह जन की बात, घर घर संविधान अभियान समितीने आयोजित केले आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT