पुणे

पिंपरी: मोदींच्या दौर्‍यामुळे कडक बंदोबस्त; देहू परिसरात शेकडो अधिकारी आणि हजारो पोलिस कर्मचारी तैनात

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहू येथे पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 14) देहूत येत आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेकडो अधिकार्‍यांसह हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरविण्यात आल्याने देहूला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हवाई किंवा कडेकोट सुरक्षा असलेल्या ताफ्यातून देहू येथे दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी हेलिपॅड आणि नियोजित रस्त्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, वाहने पार्किंगच्या ठिकाणी देखील शस्त्रधारी पोलिस तैनात आहेत. याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील उंच इमारतींवर देखील दुर्बीण घेऊन पोलिस कर्मचारी असणार आहेत. संशयित हालचाली टिपून त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधितांवर देण्यात आली आहे.

बॉम्ब शोधक/नाशक पथक देखील देहूत दाखल झाले आहे. त्यांनी परिसर पिंजून काढला आहे. तसेच, पंतप्रधानांचा ताफा येण्यापूर्वी पुन्हा एकदा स्कॅनिंग करण्यात येणार आहे. घातपातविरोधी तपासणी केली जाणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियोजित रस्त्यावरील बेवारस वाहने देखील हटवण्यात आली आहेत. मोकाट जनावरे ताफ्याच्या आडवी येणार नाहीत, यासाठी खबरदारी घेतली आहे. कॅन्व्हॉय जात असताना रस्त्यावर नागरिक येणार नाहीत, यासाठी बॅरिकेड, दोर्‍या बांधण्यात आल्या आहेत.

तसेच, संशयित व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गर्दीचा भाग बनून राहणार आहेत. निदर्शने किंवा गोंधळ घालणार्‍यांना ताब्यात घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. एकंदरीतच, मोदींच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.

केंद्राच्या सुरक्षा यंत्रणादेखील दाखल

पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी केंद्राची सुरक्षा पथकेदेखील देहूत दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून सर्व बाबी तपासल्या जात आहेत. तसेच, देशासह राज्याच्या गुप्तचर यंत्रणा देखील या दौर्‍यावर लक्ष ठेवून असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले.

सभास्थानी जाण्याचा मार्ग…

आळंदी रस्ता व तळेगाव-चाकण रस्ता येथून येणार्‍या भाविकांनी विठ्ठलवाडीपर्यंत यावे, तिथून जुन्या पालखी मार्गाचा वापर करावा.
देहूरोड-देहू रस्त्याने सरळ सभास्थानी जाता येईल.
सभास्थानापासून दीड किमीवर वाहनांची पार्किंगव्यवस्था असेल.
देहूगावातील भाविक जुन्या पालखी मार्गाने सभास्थानी जाऊ शकतात.

देहूकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद

  • पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमानपासून देहूगावपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
  • निगडीतील भक्ती-शक्ती चौक-तळवडे-कॅनबे चौकापर्यंत पर्यायी रस्ता सुरू.
  • तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा ते परंडवाल चौकापर्यंत फक्त व्हीआयपी वाहनांना परवानगी दिली आहे. इतर वाहनांना वाहतुकीसाठी रस्ता बंद राहील.
  • देहू कमान ते 14 टाळकरी कमानपर्यंत रस्ता बंद.
  • साईराज चौक-सांगुर्डी फाटा-परंडवाल चौक-भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT