धनकवडी; पुढारी वृत्तसेवा: भारती विद्यापीठ भागातील रस्त्यावर असणार्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. यामुळे अपघाताचाही धोका आहे. याकडे महानगरपालिकेच्या विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्रिमूर्ती चौक ते राजमाता जिजाऊ भुयारी मार्गात अनेक ठिकाणी अनेक मोकाट जनावरे दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसत असून, मोकाट फिरतानाही दिसतात.
सकाळ- संध्याकाळी वाहनांची मोठी वाहतूक या रस्त्याने होत असते, मात्र जनावरांमुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक दिवसांपासून ही जनावरे रस्त्याने फिरत असून, बस स्टॉप, दुकानांसमोरही बसत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून, मोकाट जनावरांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.